Meghana Deepak Sakore Bordikar : आयपीएस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश !
Meghana Deepak Sakore Bordikar : महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे १५ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये चार लाडक्या बहिणींचा समावेश आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एका आयपीएस अधिकाऱ्यांच्या पत्नीचा समावेश करण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ते नाव म्हणजे मेघना बोर्डीकर साकोरे (meghana bordikar jintur) हे होय ! IPS अधिकारी दिपक साकोरे (Deepak Sakore IPS) यांच्या त्या पत्नी आहेत.
मेघना बोर्डीकर ह्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. सलग दुसर्यांदा त्या या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांची फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. आमदार होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. मेघना बोर्डीकर यांच्यामुळे परभणी जिल्ह्याला १४ वर्षानंतर मंत्रीपद मिळाले आहे. बोर्डीकर ह्या परभणी पीडीसीसी बँकेच्या संचालक आहेत. याशिवाय त्या उद्योजिका आहेत. उच्चशिक्षित असलेल्या बोर्डीकर यांचे पुण्यातील डी.वाय. पाटील काॅलेजमध्ये शिक्षण झाले. त्या बीएससी कॉम्प्युटर आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये पदव्युत्तर आहेत.
पाच वेळा आमदार राहिलेले रामप्रसाद बोर्डीकर यांची मुलगी आणि भारतीय नौदलातील निवृत्त लेफ्टनंट यांची सून व आयपीएस अधिकारी दिपक साकोरे यांच्या पत्नी असलेल्या मेघना बोर्डीकर यांना लहानपणापासून सामाजिक व राजकीय चळवळीचे बाळकडू मिळाले. त्यांनी शिक्षणानंतर परभणी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धन, महिला आणि युवकांसाठी रोजगार निर्माण करणे, वंचित मुलांना शिक्षण देणे आणि दारू व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन कार्यक्रम चालवणे, परभणीला शाश्वत विकास लक्ष्यांकडे नेणे यांचा समावेश आहे. पाणी फाउंडेशनसह पावसाच्या पाण्याची साठवण आणि जलसंधारणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाला पाणी टंचाईपासून मुक्त करण्यास त्यांना मोठे यश मिळाले आहे.