आमदार धनंजय मुंडे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी स्पष्टच बोलले, आम्ही राजकीय वैरी आहोत.. बहिण भावाचं नातं..
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणात भाऊबंदकीचे राजकारण सातत्याने चर्चेत येत आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर कडवट राजकीय वादात होत असल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत. यातीलच मुंडे कुटूंबातील वाद जगजाहीर आहे. या वादाचे राजकीय पडसाद या ना त्या कारणाने सातत्याने उमटताना दिसतात. तीव्र राजकीय मतभेदांमुळे अनेक राजकीय कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिण भावाचं नातंही अपवाद नाही.
राजकीय वादामुळे गेल्या दिवसांपासून पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष चिघळताना दिसत आहे. बहिण भावाने एकत्र यावे असे सातत्याने प्रयत्न होत आहेत. परंतू दोघा नेत्यांमधील दुरावा कायम आहे. बहिण – भावाचं नातं राहिलेलं नाही, याची कबुली माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नुकतीच दिली.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात विविध मुद्यावरुन सातत्यानं संघर्ष होत आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर टीका करत आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पंकजा मुंडे या सातत्यानं धनंजय मुंडे यांच्या कारभारावर टीका करत होत्या.
धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याची टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली होती. तसेच बीडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की प्रत्येक काम पैसा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सामान्यांची कामं रखडली जात असल्याची टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली होती.
आमचं आता बहिण भावाचं नातं राहिलेलं नाही, आता आम्ही राजकीय वैरी आहोत.राजकारणातून नात्यात दुरावा निर्माण झाल्याची भावना धनंजय मुंडे यांनी नुकतीच बोलून दाखवली. राजकारणामध्ये आम्ही आता एकमेकांचे वैरी आहोत. नातेसंबंध अगोदर होते. वारंवार त्यांच्याकडून (पंकजा मुंडे) वादग्रस्त वक्तव्य होत आहेत. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.ते एबीपी माझाशी बोलत होते.