Monsoon 2023 : प्रतिक्षा संपली ! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय होणार, कमी दाबाचे पट्टे तयार होऊ लागले, ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जून महिना उजाडत आला तरी महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झालेला नाही. यामुळे राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.अनेक भागातील जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. तर काही भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास टँकर सुरु करण्याची वेळ येऊ शकते. तशी तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. परंतू पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे.मान्सूनची प्रतिक्षा आता संपणार आहे. मान्सून सक्रीय होण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. (Maharashtra monsoon news)
महाराष्ट्रात 7 जूनच्या आसपास सक्रीय होणार पाऊस यंदा बिपरजाॅय चक्रीवादळ आणि अल निनोमुळे लांबला आहे. बिपरजाॅय चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्याचे पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. मान्सून पुढे ढकलण्यासाठी आवश्यक कमी दाबाचे पट्टे तयार होऊ लागले आहेत. वार्यांचा वेग वाढला आहे. येत्या तीन चार दिवसांत महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. (Monsoon latest news)
अरबी समुद्र, लक्षद्विप, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. वार्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर इतका झाला आहे. मान्सून सध्या रायचूर भागात आहे. दक्षिण भारतासह ओडिशा,पश्चिम बंगाल, झारखंड, पुर्व उत्तर प्रदेश बिहार या भागापर्यंत मान्सूनने प्रगती केली आहे. सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग – रत्नागिरी पट्ट्यात मान्सून आहे. याच भागात त्याने तळ ठोकला आहे. या भागात येत्या 23 पासून पावसाला सुरुवात होणार आहे. (monsoon season 2023 news)
उत्तर भारतातील राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कमी दाबाचे पट्टे तयार होऊ लागल्याने मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून या भागात सक्रीय होऊन या भागात पाऊस सुरु झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात दिसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात पाच दिवस उष्णतेची लाट
महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात मान्सून सक्रीय होण्याचे पोषक वातावरण निर्माण होत असताना मध्य भारतात उष्णतेची लाट सक्रीय होत आहे. देशाचा पुर्व भाग व मध्य भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पारा 40 शी पार असणार आहे. विदर्भात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाट सक्रीय राहणार आहे, असा हवामान अंदाज IMD ने जारी केला आहे. संपूर्ण राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.