महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम वाढला, अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी, 24 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा मुक्काम !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. यामुळे दिवाळी पुर्वीच बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय.अश्यातच पावसाबाबत आणखीन एक महत्वाचे अपडेट समोर आली आहे. पावसाचा मुक्काम आणखीन वाढणार आहे. यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
राज्यातील मागील आठवड्यापासून परतीच्या पावसाने मोठा धुमाकूळ घातलाय. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. काढणीचा आलेली पिके पाण्यात गेली आहेत. काही पिके सडली आहेत तर काहींना कोंब फुटले आहेत. पिके वाया गेली आहेत. सरसकट पंचनामे करण्याची मागणी होत आहे. शासनाकडून अजूनही ठोस पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. सरकारने तातडीने हेक्टरी 50 हजाराची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. राज्यात प्रचंड नुकसान झालेलं असताना राजकारणी मात्र सत्तासंघर्षाच्या राजकारणात व्यस्थ आहेत.
परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिल्यानंतर राज्यातून मान्सून कधी माघार घेणार याचीच प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागातून मान्सून माघारी गेला आहे. मात्र,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सूनचा मुक्काम वाढला आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत हा मुक्काम असणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान परतीच्या पावसाचा राज्यात मुक्काम वाढला आहे. 18 ते 20 या कालावधीत राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
येत्या तीन दिवसात मुसळधार
बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीय स्थिती आहे. हिमालयात पश्चिमी चक्रवात सक्रीय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
राज्यातील खालील जिल्ह्यात येलो अलर्ट जारी
अहमदनगर, औरंगाबाद, जालना, पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातुर, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात 17 ते 19 ऑक्टोबर या काळासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या भागातून मान्सून परतीला निघाला
रविवारी मान्सूनने परतीच्या प्रवासात उत्तर भारतातील बिलासपुर, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या भागातून तर महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील बुलढाणा ब्रम्हपुरी या भागातून परतीला निघाला. मात्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण त्याचा मुक्काम वाढला आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत या भागात तो राहणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.