Monsoon Update 2023 : खुशखबर ! महाराष्ट्रात मान्सून सक्रीय, या भागात पाऊस सुरू, येत्या 48 तासांत धो-धो कोसळणार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या मान्सूनने महाराष्ट्रातील काही भागात आज सकाळपासूनच हजेरी लावली.उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिलासा दिला. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे मान्सून कोकणच्या वेशीवर रखडला होता. मान्सून वार्यांचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. येत्या 25 आणि 26 जूनला राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
शुक्रवारी विदर्भातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे विदर्भातील तापमान आठ ते दहा अंशाने घटले आहे. विदर्भात उष्णतेची लाट सक्रीय होती. ती आता घटली. शनिवारी सकाळपासूनच कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सकाळपासून मुंबई व परीसरामध्ये काही ठिकाणी हलका, मध्यम पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पुण्यातही सकाळी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि गोवा भागात पाऊस सुरू झाला आहे. अहमदनगर शहरातही आज हलका पाऊस झाला.
खरिप हंगाम 2023 साठी सज्ज झालेला बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत होता, परंतू गेल्या महिन्याभरापासून पाऊस गायब होता. राज्यातील पाणीसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केलीय. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालीय, त्यामुळे शासनाने टँकर सुरू केलेत.
एकिकडे पंढरीच्या वारीचा उत्साह तर दुसरीकडे पावसासाठी आभाळाकडे डोळे अशी परिस्थिती असतानाच आता आनंदाची बातमी समोर आलीय. राज्यात मान्सून सक्रीय होऊ लागला आहे. येत्या 48 ते 72 तासांत मान्सून महाराष्ट्राचा पुर्ण भाग व्यापेल आणि येत्या आठवडाभरात संपुर्ण महाराष्ट्रात धो धो बरसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पेरण्या खोळंबल्या..
राज्यात पावसाने दडी मारल्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शुक्रवारपासून पाऊस काही भागात पावसाने हजेरी लावलीय, यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदुर मुसळधार पाऊस झाल्यास रखडलेल्या पेरण्यांना सुरूवात होईल. जोवर 100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरण्यांसाठी घाई करू नये, असे कृषि विभागाने म्हटले आहे.