जामखेड टाइम्स वृत्तसेवा । खरिप हंगामातील महत्वाचे पीक असलेल्या मुगाची काढणीला सुरूवात झाली आहे. मुगाला यंदा किती भाव मिळणार याचीच उत्सुकता बळीराजाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ज्या भागात लवकर पेरण्या झाल्या होत्या त्या भागातील मुग काढणीला सुरूवात झाली आहे. त्यानुसार नव्या मुगाची आवक अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत होऊ लागली आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात दाखल झालेल्या मुगाला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल 7 हजार 751 इतका दर मिळाला आहे. मंगळवारी अहमदनगर बाजार समितीत 550 क्विंटल मुगाची आवक झाली होती. आता यात आणखीन वाढ होणार आहे.
सुकलेल्या मुगाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुग चांगला सुकवून तसेच स्वच्छ करून विक्रीसाठी बाजार समितीत न्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.