जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC Exam 2022) रद्द झालेल्या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा आज (३ रोजी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली. (MPSC announces new dates for exams 2022)
पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा ३९० पदांच्या भरतीसाठी २ जानेवारी २०२२ रोजी होणारी लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असतानाच आता अन्य तीन परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
कोरोना काळात शासकीय सेवांमधील भरतीसाठी परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांसाठी अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने या उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील घोषणा नुकतीच केली होती. परिणामी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे.
अधिकाधिक उमेदवारांना परीक्षेला बसण्याची संधी मिळावी यासाठी तीन परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार MPSC ने सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. २ जानेवारी रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २३ जानेवारी रोजी होणार आहे. तर २२ जानेवारीला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ हा २९ जानेवारीला होणार आहे. तसेच, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक २, पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा २९ जानेवारी ऐवजी ३० जानेवारी रोजी घेतली जाणार आहे.