MPSC Student assault case : “.. म्हणून आज माझी मुलगी वाचली, ‘अन्यथा ती दिसली नसती, जखमी मुलीच्या आईला अश्रू अनावर”, ‘आरोपी शंतनू जाधव पिडीत तरूणीला सतत त्रास द्यायचा,’
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : MPSC Student assault case : कोपरगावच्या दर्शना पवार (Darshana Pawar) या रेंज फाॅरेस्ट ऑफिसर बनलेल्या तरुणीचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुण्याच्या सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी MPSC च्या विद्यार्थीनीवर कोयत्याने हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे संबंधित तरुणीचे कुटूंबिय घाबरून गेले आहे. या घटनेवर जखमी तरूणीच्या आईने हंबरडा फोडत दिलेली प्रतिक्रिया काळीज पिळवटून टाकणारी आहे.
पुण्यातील पालक वर्ग सध्या भयग्रस्त जीवन जगत आहे.लहानाच्या मोठ्या करून शिकवलेल्या मुली कॉलेजला किंवा नोकरी निमित्त बाहेर गेल्यानंतर घरी परत येतील का, अशी भिती वाटत आहे. दर्शना पवार या भावी अधिकारी तरुणीचा प्रेम प्रकरणातून खून झाला ही घटना ताजी आहे. लग्नाला नकार दिल्याने तिच्याच मित्राने तिचा खून केला. तर, आता मंगळवारी भररस्त्यात एका २० वर्षीय तरूणीवर तिच्या मित्राने हल्ला केला. या घटनेनंतर जखमी तरूणीच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. “आज माझी मुलगी वाचली. तिचा दुसरा एक मित्र होता. म्हणून ती वाचली. अन्यथा ती दिसली नसती मला, हंबरडा फोडत दिलेली प्रतिक्रिया काळीज पिळवटून टाकणारी आहे. तिचे आश्रू थांबतच नव्हते.
नेमकं सदाशिव पेठेत काय घडलं ?
मंगळवारी पुणे शहरातील सदाशिव पेठ भागातून एक तरूणी आपल्या मित्रासमवेत स्कुटीवरून जात होती. त्यावेळी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २२, रा. मुळशी) या तरूणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. सकाळी १० वाजता ही घटना घडली. तरूणाने हल्ला करताच तरूणी रस्त्यावर धावत सुटली होती, वाचवा वाचवा म्हणून ती लोकांकडे मदत मागत होती. परंतू तिच्या मदतीला तात्काळ कोणी आलं नाही.
परंतु काही वेळानंतर ती धावत असतानाच तिच्यावर हल्लेखोर तरूण हल्ला करणार तोच दोन तरूण तिच्या मदतीला धावून आले. शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत दोघा युवकांनी तरुणीचा जीव वाचला आहे. त्यानंतर वार करणाऱ्या आरोपीला चोप देत पेरू गेट पोलीस चौकी येथे नेण्यात आलं एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितला सदाशिवपेठेतील घटनाक्रम
पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, आज दहाच्या सुमारास, एसपी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर तरुण आणि तरुणी आमने-सामने आले होते. दोघांची आधीपासून ओळख होती. दोघेही शिक्षणासाठी एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. नंतर दोघांचे बोलणे बंद झाले होते. तो मुलगा तिला सतत बोलण्यासाठी भाग पाडत होता. तिला फोन करत होता. तो इथे आला तेव्हा तिच्याबरोबर बोलण्याचा प्रय़त्न केला. तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. तिच्या हातावर व डोक्यावर जखम झाली आहे.
दोघा तरूणांमुळे वाचले तरुणीचे प्राण
पुण्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना आज घडली. या घटनेत लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरूणाने धाडस दाखवत तरुणीवर होणारा कोयत्याचा हल्ला रोखत तिचा जीव वाचवला. लेशपाल याला हर्षद पाटील या तरुणाने यावेळी मदत केल्याने हल्लेखोर तरूण शंतनू जाधव याला पकडण्यात यश आले. लेशपाल जवळगे व हर्षद पाटील (Harshad Patil) या दोन तरूणांनी दाखवलेल्या धाडसाचे राज्यभरातून कौतूक होत आहे.
कोण आहे शंतनू जाधव
या प्रकरणातील आरोपी शंतनू हा मुळचा मुळशी येथील असून, तो पुण्यात शिक्षणासाठी आहे. त्याचे बी.कॉमचे शिक्षण झाले आहे. तर, तरुणीचेही बी. कॉमचे शिक्षण झालेले आहे. दोघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. सध्या ही तरुणी आर्किटेक्चरचे शिक्षण घेते. गेल्या २ ते ३ महिन्यांपासून तरुणीमध्ये व त्याच्यात अबोला सुरू झाला होता. त्यांच्यात पूर्वी मैत्रीचे संबंध होते. ते मित्र होते. पण, तरुणी काही कारणास्तव त्याला टाळत होती. तसेच, तिने त्याला बोलण्यासाठी नकार देखील दिला होता. तरीही शंतनू तरुणीचा पाठलाग करत होता. तिला फोन करून त्रास देत होता.
तरीही शंतनू तिचा नाद सोडण्यास तयार नव्हता
याबाबत तरुणीने व तिच्या कुटुंबाने शंतनूच्या पालकांकडे तक्रार देखील केली होती. त्यांनी त्याला आम्ही सांगतो, असे सांगितले होते. तर या तरुणीच्या आईने देखील त्याला नाद सोड असे सांगितले होते. तिला त्रास देऊ नकोस, असेही बजावले होते. पण, शंतनू तिचा नाद सोडण्यास तयार नव्हता. महाविद्यालयात व महाविद्यालयापर्यंत तिचा पाठलाग करत होता. तरुणी कर्वेनगर परिसरात राहण्यास आहे. तेथून तो पाठलाग करत होता. तिला मारहाण देखील करत असत. याबाबत तरूणीच्या कुटूंबियांनी शंतनूच्या कुटूंबाला तक्रार केल्याच्या रागातून त्याने हा हल्ला केला.
तरुणी महाविद्यालयाला जाण्यासाठी निघाली अन्.
दरम्यान, तरुणी आज सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली होती. तिला तिच्या आईने दुचाकीवर आणून सोडले होते. महाविद्यालयाच्या काही अंतर अलीकडे सोडून आई कामावर गेली. त्याचवेळी तिच्या पाठलागावर असलेल्या शंतनू याने तिला अडविले. थांब मला बोलायेच असे सांगितले. पण, तिने नकार देत पुढे गेली. त्याचवेळी शंतनूने कोयता बाहेर काढून तिच्यावर वार करण्यास सुरूवात केली. तिच्या डोक्यात वार केल्यानंतर तरुणीने पळाली. शंतूनने देखील तिचा पाठलाग सुरू केला. भररस्त्यात हा थरार सुरू झाल्यानंतर येथील नागरिक व तरुणांनी शंतनूला अडविले. पण, त्याने नागरिकांवर देखील कोयता उगारला. तरीही धाडसाने काही तरुणांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
सांगा माझी मुलगी परत येईल का..!
पुण्यातील पालक वर्ग सध्या भयग्रस्त जीवन जगत आहे. लहानाच्या मोठ्या करून शिकवलेल्या मुली कॉलेजला किंवा नोकरीनिमित्त तसेच बाहेर गेल्यानंतर परत येतील का, अशी भिती वाटत आहे. दर्शना पवार या भावी अधिकारी तरुणीचा प्रेम प्रकरणातून खून झाला. लग्नाला नकार दिल्याने तिच्याच पुर्वीच्या मित्राने तिचा खून केला. तर, आता भररस्त्यात पुर्वीच्याच मित्राने २० वर्षीय तरूणीवर हल्ला केला. यावेळी तिच्या आईचे आश्रू बंद होत नव्हते. आज माझी मुलगी वाचली. तिचा दुसरा एक मित्र होता. म्हणून ती वाचली. अन्यथा ती दिसली नसती मला. पण, अस जर होत असेल तर मुलीची सुरक्षितता राहिली कुठ आणि गेली कुठ. विश्वास ठेवायचा कसा. आज कॉलेजला गेलेली मुलगी परत येईल का याचीही शाश्वती राहिली नाही. अशा मुलांना जगू देखील दिले नाही पाहिजे, अशी भावना मुलीच्या आईने व्यक्त केली आहे.
विद्यार्थिंनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पुण्यातील वर्दळीचा परिसर असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. पीडित तरुणी ही आज सकाळच्या सुमारास क्लासला गेली होती. मात्र, परत येताना अचानक मागून येत एका तरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयता तिच्या हाताला लागल्याने ती ओरडली आणि स्वत:ला वाचविण्यासाठी तिने आरडाओरडा सुरु केली. हा आवाज ऐकून काही तरुणांनी तिच्या दिशेने धाव घेत तिला वाचवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदाशिव पेठ हा पुण्यातील वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यात याच परिसरात भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्याने विद्यार्थिंनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
लेशपाल जवळगे याच्या धाडसाचे महिला आयोगाने केले कौतुक
आज पुण्यामध्ये कोयत्याने तरुणीवर हल्ला करण्याचा गंभीर प्रकार घडला. यावेळी प्रसंगावधान दाखवत लेशपाल जवळगे या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावून त्या पिडीत मुलीला हल्ल्यातून वाचवले. यावेळी गुन्हेगाराच्या हातातील कोयता हिसकावून घेताना लेशपालच्या बोटाला लहान इजा झाली आहे. लेशपाल तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते, तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहे. लेशपाल, आज तुझ्यामुळे एक जीव वाचला, तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे, अशी फेसबुक पोस्ट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी लेशपाल याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.