जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Darshana Pawar death case : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) येथील दर्शना पवार या MPSC टाॅपर विद्यार्थीचा पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या (Rajgad Fort news) पायथ्याशी सतीचा माळ या ठिकाणी अर्धवट सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Darshana Pawar latest news)
मयत दर्शना पवार हिच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात दर्शनाच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. याच कारणाने दर्शनाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शना दत्ता पवार (वय 26) असे मयत विद्यार्थीचे नाव आहे. ती आपल्या मित्रासमवेत राजगड किल्ल्यावर गेली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजमध्ये ही बाब समोर आली. दरम्यान दर्शनासोबत राजगड किल्ल्यावर गेलेला तिचा मित्रही गायब आहे. दर्शनाच्या मृत्यूचे गुढ उकलण्यासाठी पुणे पोलिसांची पाच पथके वेगाने तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय ? (Darshana Pawar death case)
दर्शना दत्तु पवार ही 26 वर्षीय विद्यार्थीनी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती. तीने नुकतेच MPSC परिक्षेत घवघवीत यश संपादन केले होते. ती या परिक्षेत राज्यात सहावी आली होती. रेंज फाॅरेस्ट ऑफिसर म्हणून तिची निवड झाली होती. एमपीएससी परिक्षेत मोठे यश मिळवल्याबद्दल तिचा पुण्यातील एका खाजगी स्पर्धा परिक्षा ॲकॅडमीकडून 9 जून रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता. 10 जून रोजी तिने कोणाचेही फोन उचलले नाही. दोन दिवस दर्शनाशी संपर्क न झाल्याने 12 जून रोजी तिच्या कुटुंबियांनी पुणे गाठत खाजगी ॲकॅडमीत तिच्याविषयी चौकशी केली.
यावेळी तिच्या कुटुंबियांना अशी माहिती मिळाली की, दर्शना ही तिचा मित्र राहूल दत्तात्रय हंडोरे याच्यासोबत सिंहगड- राजगड किल्ले फिरण्यासाठी गेली आहे. तेव्हापासून तिचा या भागात कसून शोध घेतला जात होता. 17 जून रोजी तिचा राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी अर्धवट सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दरम्यान 12 जून रोजी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आली होती.
मयत दर्शना पवार हिचे वडील दत्ता दिनकर पवार यांच्या फिर्यादीवरून वेल्हे पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार हे तपासी अधिकारी आहेत. दर्शनाचा खून कोणी व कोणत्या कारणासाठी करण्यात आला आला याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.