जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बॉलिवूड स्टार सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.सलमानचे वडील सलीम खान यांना घराजवळच्या बाकड्यावर पत्र ठेवणाऱ्या लोकांचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय. (Mumbai Police’s big revelation in Salman Khan threat case latest news )
पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याच चौकशीदरम्यान हा खुलासा झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाकाल हा बिष्णोई टोळीचा सदस्य आहे. महाकाळने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते.
पत्र त्या तिघांनी पोहचवलं.
“तुरुंगामध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईने हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावे पाठवलं होतं. राजस्थानमधील जलोरी येथून बिष्णोई टोळीचे तीन जण मुंबईमध्ये आले होते. त्यांनीच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं. तसेच त्यांनी सौरभ महाकालचीही यावेळी भेट घेतली,” असं पोलिसांनी चौकशीदरम्यान समोर आल्याचं स्पष्ट केलंय. तसेच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करणाऱ्या तीन जण कोण आहेत याबद्दलची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागलीय.या लोकांची ओळख पटल्यानंतर देशाच्या वेगवगेळ्या भागांमध्ये सहा तुकड्या पाठवण्यात आल्यात,” असंही पोलीस म्हणाले.
विक्रम बराड कोण?
विक्रम बराड हा बिष्णोईचा सहकारी असून त्याच्यावर एक डझनहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. विक्रमजीत सिंह बराड असं त्याचं संपूर्ण नाव आहे. एकेकाळी विक्रम हा राजस्थानमधील कुप्रसिद्ध गँगस्टर आनंदपालचा सहकारी होता. मात्र आनंदपालला पोलिसांनी ठार केल्यानंतर तो बिष्णोई टोळीत सहभागी झाला.
बिष्णोई टोळी कनेक्शवरुन झाली चौकशी
बिष्णोई टोळीने मुसेवालांची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ संशयित आरोपी आहेत. बिष्णोई टोळीने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याअनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी महाकाळची चौकशी केली.
मुसेवाला हत्या प्रकरणात सौरभ महाकालची चौकशी सुरू असून त्याने पंजाबला गेलो नव्हतो,असा दावा केला आहे. त्याचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून आळेफाटा येथे त्याचे वडील चालक म्हणून काम करतात. मी आणि भाऊ शेती करतो, असे त्याने चौकशीत सांगितले.
सौरभला अटक जुन्या प्रकरणात
मंचरमधील गुंड ओंकार उर्फ राण्या बाणखेले खून प्रकरणात संतोष जाधवला सिद्धेश कांबळे उर्फ महाकालने आश्रय दिला होता. ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई केली होती. पुणे ग्रामीण पोलिसांंकडून बाणखेले खून प्रकरणाचा तपास सुरू आहे, असं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितलं.
सलमानच्या घरची सुरक्षा वाढवली
५ जून रोजी सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने सलमान आणि त्याच्या वडिलांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
काय आहे धमकीचे प्रकरण?
सलीम खान यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा म्हणझेच अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे