Mumbai Rain Update Today : मुंबईला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा

Mumbai Rain Update Today : परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना कालपासून झोडपले आहे. अजूनही काही भागात जोरदार पाऊस बरसत आहे. आज मुंबई शहराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे व पालघर भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Mumbai rain update today, Heavy rains hit Mumbai again, red alert Mumbai

मुंबई व परिसरात सायंकाळी ५ नंतर परतीच्या पावसाला सुरुवात झाली. पावसाने दोन तास तुफान बॅटिंग केली. अतिमुसळधार पावसामुळे अंधेरीतील सबवे परिसर पाण्याखाली गेलाय. तर कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड या भागातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते.

रस्त्यांवर पाणी आल्याने पश्चिम व पुर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या मार्गावरील वाहतुक संथ झाली होती. या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. मुसळधार पावसामुळे मध्य मार्गावरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटाने विस्कळीत झाली होती. तर पश्चिम मार्गावरील जलद लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु होती. तर स्लो मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटाने धावत आहे.

हवामान विभागाने आज २५ रोजी मुंबई व लगतच्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी पावसाने तुफान बॅटिंग केली. नवी मुंबईतील जुईनगर, बेलापुर, ऐरोली परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अंबरनाथहून बदलापूरकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे.

हवामान विभागाने उद्या २६ रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई व परिसरात आज पावसाने चांगलेच झोडपून काढले. उद्याही पावसाचा जोर असणार आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

कुलाबा – ३७ मिमी, वडाळा ३१ मिमी, पुर्व उपनगर २९ मिमी, पश्चिम उपनगर ८ मिमी, भायखळा २८ मिमी, सायन २७ मिमी, चंदनवाडी २४ मिमी, नरिमन पॉइंट २३ मिमी, मानखुर्द ४१ मिमी, टिळकनगर ३४ मिमी, शिवाजीनगर २९ मिमी, मुलुंड २५ मिमी, घाटकोपर २८ मिमी, भांडूप २४ मिमी अश्या पावसाची दोन सायंकाळपर्यंत झालेली आहे. अजूनही मुंबई व परिसरात पावसाचा जोर आहे.