मोठी बातमी : जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नवीन पक्षाचं नाव ठरलं, केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली ‘या’ नावाला मान्यता !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड पुकारले. यामुळे राष्ट्रवादीत उभी फुट पडली खरी मात्र आम्हीच खरे राष्ट्रवादी असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाने केला. राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) संघर्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला. निवडणूक आयोगाने मंगळवारी शरद पवारांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष व चिन्ह अजित पवारांच्या ताब्यात दिले. यामुळे शरद पवारांचा पक्ष कोणता असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर शरद पवार यांच्या पक्षाचे नाव ठरले असून (Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar) त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिक्कामोर्तब केले आहे.

name of the new party of senior leader Sharad Pawar has been decided, Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar,

अजित पवारांच्या ताब्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष गेल्याने राष्ट्रवादीतील शरद पवार गटाला आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह निश्चित करण्याची आजची मुदत होती. त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार हे तीन नावे दिले होते.

त्यापैकी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव निवडणूक आयोगाने मंजुर केले आहे.  त्यामुळे आता शरद पवार गटाचे नव्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे असणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत हे नाव देण्यात आलं आहे. पक्षाच्या चिन्हावर मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

शरद पवार यांच्या हातातून जो पक्ष गेला हा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी हे नाव, आणि नवीन नावात शरद पवारांचं स्वतःचं नाव हे या नवीन नावात दिसून येतंय. त्यामुळे या नावाचा पर्याय देताना हा मुद्दा लक्षात घेतला गेला असल्याची माहिती मिळतेय.

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिल्यानंतर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सूचना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दिलेल्या पर्यायामधून शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आलं आहे. शरद पवार गट हा वटवृक्ष या नव्या चिन्हासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबद्दलचा लवकरच निर्णय लागण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका असून त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पवार गटाला आता या नवीन नावावर निवडणूक लढवता येणार आहे. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट आणि उध्दव ठाकरे गट या दोन्ही गटांच्या पक्षाला कोणते नाव व चिन्ह मिळते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. सध्या मिळालेले नाव आणि चिन्ह याच्याच बळावर शरद पवार व उध्दव ठाकरे आगामी निवडणुकांना सामोरे जाणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शितल कलेक्शन जामखेड