Natasha Awhad : बाबा, हे अभिमानास्पद आहे ! नताशा आव्हाडची ट्विटर पोस्ट राज्यात आली चर्चेत ! काय आहे या पोस्टमध्ये ? जाणून घ्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एका वृत्तवाहिनीने भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांच्या आक्षेपार्य व्हिडीओचा भांडाफोड केल्याने राज्यात महाभूकंप झाला. सोमय्या प्रकरणामुळे देशभर धुमाकूळ उडाला आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Legislative Council Leader of Opposition Ambadas Danve) यांनी पावसाळी अधिवेशनात पेनड्राईव्ह बाँम्ब टाकत मोठी खळबळ उडवून दिलीय. किरीट सोमय्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतू राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोमय्या प्रकरणात घेतलेल्या वेगळ्या भूमिकेची फेसबुक पोस्ट चर्चेत आली होती. आता आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड (Natasha Awhad) यांची पोस्ट राज्यात चर्चेत आली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित काही नाजूक व्हिडीओ बाहेर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. सोमय्या यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. परंतू राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट सध्या राज्यात चर्चेत आली आहे. आव्हाड यांनी राजकीय नेत्याच्या खाजगी आयुष्यावरून भावनिक पोस्ट लिहीत सध्या सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलयं ?
जितेंद्र आव्हाड म्हणतात की, राजकारणाचा स्तर प्रचंड खालावला आहे. वैयक्तीक हल्ले करुन एखाद्याचे राजकीय जीवन संपवायचे ह्या प्रकाराचा मी निषेध करतो. त्याचं वैयक्तीक जीवन जेव्हा तुम्ही संपवता; तेव्हा त्याचं घर, दार, त्याची पत्नी, मुले, सुना ह्या सगळ्यांवर त्याचा परीणाम होतो. आपला तो राजकीय शत्रू जरी असेल तरी तो विचारांचा शत्रू आहे. वैयक्तीकरीत्या त्याच्यावर हल्ला करुन त्याचे वैयक्तीक जीवन उध्वस्त करण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही.
त्यामुळे आता एका व्यक्तीबद्दल जे काही फिरत आहे आणि लोक ज्याच्याबद्दल टाळ्या देत आहेत; हे काही योग्य नाही असं मला वाटतं. थोडीशी संवेदनशीलता राजकारण्यांनी बाळगायला हवी. समाज जीवनामध्ये एखाद्याला उध्वस्त करणं हे फार सोप्प आहे. पण, 30-40 वर्षे देऊन ह्या स्तरावर आलेला असतांना एखाद्याला 5 मिनिटांत उध्वस्त करणं हे मला तरी काही पटत नाही.
मी 1995 साली शरद पवार साहेबांकडे बीजेपीच्या एका मोठ्या नेत्याचा सातबारा घेऊन गेलो होतो. तो सातबारा एका भलत्याच महिलेच्या नावावर होता. शरद पवार साहेबांना मी सांगितले की, साहेब ह्या सातबा-याचा मोठा उपयोग होऊ शकतो. साहेबांनी सातबारा माझ्या हातातून घेतला आणि ड्रॉवरमध्ये टाकला आणि मला म्हणाले ‘जितेंद्र राजकारणामध्ये राजकीय विचारांचे मतभेद असतात, त्याच्या वैयक्तीक जीवनामध्ये तो काय करतो याच्याशी आपल्याला काहीएक देणंघेणं नाही. असा विचार पुढच्या येणा-या दिवसांमध्ये कधीच करत जाऊ नकोस. आपण एवढं खाली घसरायचं नाही.
नताशा आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलयं ?
जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या या पोस्टवर आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी एक पोस्ट लिहीत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये नताशा आव्हाड म्हणते बाबा, हे अभिमानास्पद आहे, नताशा आव्हाड हिने कोरोना काळातील एक प्रसंग आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे.
नताशा आव्हाड आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहीते की, बाबा,जेव्हा तुम्ही covid मध्ये सिरियस होतात, तेंव्हा हेच किरीटजी तुम्ही आजारी नाहीतच, नाटक करत आहात असे खोटे आरोप करत पुरावा मागत होते.तेंव्हा आपल्या परिवाराने यांच्यामुळे खूप मानसिक त्रास भोगले. तरी आज किरीटजींच्या खाजगी आयुष्याच्या हक्कांसाठी उभे राहिलात हे अभिमानास्पद आहे! नताशा आव्हाड हिच्या या पोस्टची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.