जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतातील विद्यापीठे व महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्तिमत्व विकास व्हावा, शिक्षण घेत असताना त्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी येवू नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ ऑगस्ट, २०२४ हा दिवस राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग दिवस व भारतातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांत १२ ते १८ ऑगस्ट हा सप्ताह राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग सप्ताह साजरा करण्याचे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ॲन्टी रॅगिंग दिवस साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, वसतिगृह कुलमंत्री डॉ. मनोज गुड, उप कुलमंत्री डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. नजिर तांबोळी, डॉ. महेश निकम, डॉ. राहुल विधाते, डॉ. प्रणाली ठाकरे आणि प्रा. अर्चना महाजन सह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्यासाठी सूचित केले, तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. अनारसे यांनी रॅगिंग म्हणजे काय?, ॲन्टी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. डॉ. गुड यांनी वसतिगृहात शिस्तीचे पालन करून खेळीमेळीच्या वातावरणात वास्तव्य करावयास संबोधित केले. सदर कार्यक्रमा दरम्यान, विद्यार्थ्यांना लघुपटाद्वारे ॲन्टी रॅगिंगची इत्यंभूत माहिती दाखविण्यात आली, ज्यामध्ये ॲन्टी रॅगिंग वेबसाईट, टोल फ्री क्रमांक, तक्रार नोंदणी प्रक्रिया इत्यादी बाबींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना महाजन तर आभार प्रदर्शन डॉ. प्रणाली ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.