NDA vs INDIA : लोकसभा निवडणुक 2024 चे बिगुल वाजले, सत्ताधारी NDA व विरोधी INDIA गटात कोणते पक्ष सहभागी ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) ला अवघे काही महिने उरले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. देशात मागील दोन दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी NDA ने 38 पक्षांना एकत्रित करत आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तर दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया (Indian National Developmental Inclusive Alliance – INDIA) या गटाने बंगलोरमध्ये 26 पक्षांना सोबत घेत शक्तिप्रदर्शन केले. यातून सत्ताधारी आणि विरोधकांच्या गटाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमांतून देशात तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सरसावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिल्लीत NDA ची बैठक बोलावली होती. या बैठकीला 38 पक्षांचे प्रमुख उपस्थितीत होते. विरोधकांची बंगलोरमध्ये बैठक पार पडली. विरोधकांनी नव्या आघाडीचे घोषणा केली. नव्या आघाडीला भारतीय राष्ट्रीय विकासवादी सर्वसमावेशक आघाडी (INDIA) हे नाव देण्यात आले आहे. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाली आहेत.
सत्ताधारी NDA व विरोधी INDIA या दोन्ही गटात कोणते पक्ष सहभागी झाले आहेत पाहूयात !
NDA : भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार), रालोपा (पारस), शिरोमणी अकाली दल संयुक्त, आरपीआय (आठवले), अपना दल (सोनेलाल), लोकजनशक्ती पार्टी (पासवान), एआयडीएमके, एनपीपी, एसकेएम, एनडीपीपी, आयएमकेएमके, आजसु, एमएनएफ, जेजेपी, आयपीएफटी (त्रिपुरा), बीपीपी, पीएमके, एमजीपी, एजीपी, निषाद पार्टी, युपीपीएल, एआयआरएनसी, तमिळ मनिला काँग्रेस, जनसेना, हम, रालोसपा, सुभासपा, बीडीजेएस (केरळ), केरळ काँग्रेस (थाॅमस), गोरखा नॅशन लिबरेशन फ्रंट, जनातिपथ्य- राष्ट्रीय सभा, युडीपी, एचएसडीपी, जनसुराज्य पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी या पक्षांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीत सहभाग आहे.
INDIA : काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उध्दव ठाकरे), तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, सीपीएम, आम आदमी पार्टी, सीपीआय, झारखंड मुक्ती मोर्चा, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, इंडियन युनियन मुस्लिम लिग, केरळ काँग्रेस (एम), सीपीआय (एमएल), आरएलडी, एमएमके, वीसीके, आरएसपी, केडीएमके, केरळ काँग्रेस, अपना दल (कमेरावादी), एआयएफबी, एमडीएमके या पक्षांचा विरोधकांच्या इंडिया (Indian National Developmental Inclusive Alliance) या आघाडीत समावेश आहे.
2019 लोकसभा निवडणूक आकडेवारी काय सांगते ?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपने 37.7 टक्के मते घेतली होती. तर भाजपप्रणीत NDA ने 45 टक्के घेत एकुण 353 जागांवर दणदणीत विजय संपादन केला होता. या निवडणुकीत विरोधक विखुरलेल्या स्थितीत निवडणूक लढले होते. त्या सर्वांनी मिळून एकुण 55 टक्के मतदान घेतले होते. विरोधक विखुरल्याचा मोठा फायदा भाजपला झाला होता. भाजपने एकहाती सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती.
सध्याची स्थिती काय ?
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सरसावलेल्या NDA आणि INDIA या दोन गटांकडे सध्याच्या बलाबलावर नजर टाकली असता INDIA गटाकडे 150 खासदार आहेत. तर NDA गटाकडे 353 खासदार आहेत. विशेष म्हणत NDAत सहभागी झालेल्या 38 पक्षांपैकी जवळपास 65 टक्के पक्षांचा सध्या एकही खासदार नाही, तर दुसरीकडे INDIA आघाडीत सहभागी 26 पक्षांपैकी 55 टक्के पक्षांकडे एकही खासदार नाही.
लोकसभा निवडणूक होणार रंगतदार
2024 च्या लोकसभा निवडणूक NDA विरूध्द INDIA अशी रंगवताना दिसणार असल्याचे चित्र सध्या आहे. परंतू दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे. जागावाटपात वाद न झाल्यास 2024 निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होताना दिसणार आहे, असेच सध्या चित्र आहे.