जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शुक्रवारी भीषण अपघाताच्या घटनेनं अहमदनगर जिल्हा हादरून गेला,या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही दु:खद घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून समोर आली आहे. (Ahmednagar 6 killed 7 injured in Kopargaon container and rickshaw accident today)
कोपरगाव येथील मुंबई-नागपूर महामार्गावर शुक्रवारी कंटेरनर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तब्बल 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
PB-05-AB-4006 या कंटनेरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला कट मारुन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला (क्रमांक MH-17-AJ 9056) जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, रिक्षामधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील प्रवाशांसह मोटारसायकलवरील तिघे असे 7 जण जखमी असून जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृतांमध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. सदर दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण अपघातातील मृत पावलेल्यांची नावं
1. राजाबाई साहेबराव खरात (वय 60 वर्ष, रा. चांदेकसारे)
2. आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय 65 वर्ष, रा. वावी)
3. शैला शिवाजी खरात (वय 42 वर्ष, रा. श्रीरामपूर)
4. शिवाजी मारुती खरात (वय 52 रा. श्रीरामपूर)
5. पूजा नानासाहेब गायकवाड (वय 20 वर्ष, रा. हिंगणवेढे)
6. प्रगती मधुकर होन (वय 20 वर्ष, रा. चांदेकसारे)
तर जखमींमध्ये विलास साहेबराव खरात, कावेरी विलास खरात, रुपाली सागर राठोड, धृव सागर राठोड तसेच मोटार सायकल वरील. दिगंबर चौधरी यांच्यासह त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी आणि बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी हे किरकोळ जखमी झाले आहेत.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींवर एस. जे. एस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तर या अपघातात मृत्यू झालेल्याचे मृतदेह पोलिसांनी शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे पाठवले आहेत.
जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी रिक्षामध्ये एकूण दहा जण होते.त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान, या अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग (वय 42 वर्ष, रा. दानामंडी लुधियाना पंजाब) हा नाशिकच्या दिशेने फरार झाला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला झगडे फाटा येथून ताब्यात घेतले आहे.
या अपघाताच पुढील तपास कोपरगाव पोलीस करीत आहेत. या भीषण अपघाताने कोपरगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्हा हादरला आहे.