नाशिक, वृत्तसेवा | गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव आणि सांगाडे आढळल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. रविवारी रात्री मुंबई नाका पोलीस ठाण्याच्याच mumbai naka police station) पाठीमागील सोसायटीतून हा प्रकार समोर आला.(Eight ears, human head, hands and other human organs found in closed Shops, Nashik trembled)
सगळ्यात गंभीर म्हणजे हे अवयव वेगवेगळे असून वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित आणि साठवणूक केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई नाका पोलीस स्टेशनलगत असलेल्या हरी विहार बिल्डिंगच्या बंद पडलेल्या गाळ्यांमध्ये हे अवयव सापडले असून ते फॉरेन्सिक लॅब व मृतदेह परीक्षणासाठीच्या प्रयोगशाळेत ठेवल्या जाणाऱ्या अवस्थेत आढळले आहेत. या गाळ्यांत वेगवेगळ्या बादल्यांमध्ये केमिकल परीक्षण व प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान व अन्य शारीरीक अवयव सापडले आहेत. केमिकल प्रक्रिया करून ठेवलेले मानवी अवशेष ही सापडले आहेत.
दरम्यान, गाळे मालकाने दिलेल्या माहितीनुसार, हे गाळे पंधरा वर्षापासून उघडलेलेच नाहीत. ते बंदच होते. याबद्दल मला काहीच माहित नाही असा दावा ही त्यांनी पोलिसांकडे केला आहे. हरी विहार सोसायटीमध्ये काही गाड्यांचे बॅटरी चोरीला गेल्यावर सोसायटीचे चेअरमन चोरीला गेलेल्या बॅटरी शोधत असतांना त्यांना सोसायटीच्या परिसरातील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या गळ्याच्या आत हे अवयव दिसले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि हे सगळे प्रकरण समोर आलं.
गाळा मालकांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे काही विद्यार्थी येथे राहत असल्याने या गाळ्यांत काही वस्तू ठेवल्या असेल असे शिंदे यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. याबाबत मुंबई नाका पोलीस या घटनेच तपास करत आहे.
एकूणच पोलिसांनी मानवी अवयव तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. मात्र, मेडिकल कॉलेजमध्ये असलेले अवयव बाहेर कसे आले ? आणि याबाबत मेडिकल कॉलेजकडून पोलिसांना या बाबत माहिती का देण्यात आली नाही ? दिली असेल तर हे प्रकरण दडून का ठेवण्यात आले असे एक ना अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून नाशिक पोलिसांना या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहे