Nashik IT Raid News Today : नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या छापेमारीत तब्बल 8 कोटींची रोकड व 3 कोटींचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय नाशिकमधील कंत्राटदारांच्या 850 कोटी रूपयांच्या बेहिशोबी व्यवहाराचे मोठे घबाड आयकर विभागाच्या हाती लागले आहे. या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० जानेवारीला नाशिकमध्ये शासकीय कंत्राट घेणाऱ्या ८ कंपन्यांवर करचुकवेगिरीच्या संशयावरून छापेमारी केली. ज्या कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली त्या सगळ्या कंपन्या अनेक राजकीय नेत्यांशी संबधित असल्याची चर्चा नाशिक शहर व राज्यात रंगली आहे, ते नेते कोण याचा शोध लागणार का ? याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
नाशिकच्या गंगापूररोड,गोविंद नगर आणि कॉलेज रोड परिसरातील या कंपन्यांचे कार्यालय आणि कंपनी मालकांची घर आयकर विभागाने लक्ष केली,एकाच वेळेला एकाच दिवशी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या धाडी नंतर या ठेकेदारांची पळापळ सुरू झाली,या कारवाई दरम्यान संबधित ठेकेदारांकडे काहीही मिळत नसल्याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिसरा डोळा उघडला आणि अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या ज्या पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण चित्रपटात काम करत असल्याचा भास झाल्याच या अधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितल.
घराच्या छतात लपवलेल्या हार्ड डिस्क, पंख्याला चिपकवलेले पेन ड्राईव्ह आणि गाडीत रोकड ठेवून झाडाझुडपात लपवलेली गाडी, या सगळ्यात आयकर विभागाला ८५० कोटीहून अधिक बेहिशोबी व्यवहाराची कागदपत्रे,सरकारी आणि खाजगी बँकांच्या लॉकर मद्ये ठेवलेली ६ कोटीची कॅश, झोपडपट्टीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरातील बेड खालून दोन कोटींची रोख रक्कम कागदपत्रे आणि इतर ठिकाणाहून ३ कोटींचे दागिने सोन्याची बिस्कीटेही आयकर विभागाच्या हाती लागले. आयकर विभागाला हजार कोटींच्या जवळपास बेहिशोबी संपत्ती मिळाल्याने या कारवाईच सामान्यांकडून स्वागत केलं जातं आहे.
आयकर विभागाने नाशिकमधील आठ शासकीय कंत्राटदारांच्या घरांसह त्यांच्या कार्यालयांवर छापेमारी केली. या कारवाईत आयकर विभागाने बेहिशोबी व्यवहारांचे कागदपत्रे जप्त केली आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अनेक कंत्राटदारांचे धाबे दणाणून गेले आहेत.
नाशिक शहरातील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालयांमध्ये चाैकशी केली होती. राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्तींच्या देखील या कंत्राटदारांकडे गुंतवणूक केल्याची कागदपत्रे विभागाला सापडली आहेत. या कारवाईनंतर कोणता राजकीय नेता आयकर विभागाच्या रडारवर येतो, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.