लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी, कश्यावर असेल निर्बंध ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात गोवंश व म्हैसवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा संसर्ग मोठ्या वेगाने वाढला आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारकडून वेगाने उपाययोजना राबवल्या जात आहेत. अहमदनगरसह राज्यात प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ (२००९ चा २७ ) याची कलमे (६) (७) (११) (१२) व (१३) नुसार संपुर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
लम्पी चर्मरोगाचा प्रसार होवू नये म्हणून अहमदनगर जिल्हयात उपरोक्त अधिसूचनेनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व महाराष्ट्र अधिसूचना दिनांक १७ जून,२०२२ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारान्वये लम्पी स्कीन या अनुसुचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपुर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात खालील निर्बंध जारी
1) अहमदनगर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर (एलएसडी) नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले अथवा ठेवले जातात, त्या ठिकाणापासुन नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
2) अहमदनगर जिल्हयात गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्याच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्याचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.
3) गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.
4) नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या वरील रोगाने बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यांस मनाई करण्यात आली आहे.
5) वरिल आदेशाची अंमलबजावणी अहमदनगर जिल्हयातील पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, कटक मंडळ, नगरपरिषद/नगरपंचायत, ग्रामपंचायत), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर/श्रीरामपूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.