मानवतेला काळिमा फासणारी घटना : स्मशानात दोन गटांत राडा, हाणामारीसाठी कार्यकर्त्यांनी उपसली सरणाची लाकडे
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : एकिकडे स्मशानात चिता पेटलेली असतानाच जुना राजकीय वाद उफाळून आला आणि दोन गटांत तुफान राडा झाला. जळणाऱ्या चितेची पर्वा न करता सरणाची लाकडे घेऊन कार्यकर्त्यांनी फ्री स्टाईल हाणामारी केल्याची धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना नाशिकमधून समोर आली आहे. या घटनेत अक्षरशा: मानवतेचा मुडदा पाडण्यात आला.
नाशिकमध्ये लोककवी विनायक दादा पाठारे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जुन्या राजकीय वादातून कार्यकर्ते आपापसात भिडल्याची घटना घडली. हे दृश्य इतके भयाण होते की, एकीकडे चिता पेटलेली आणि दुसरीकडे सरणाची लाकडे घेऊन कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली होती. या धक्कादायक घटनेमुळे स्मशानघाटावर मोठी खळबळ उडाली होती.
याप्रकरणी माजी महापौर अशोक दिवे, त्यांचे पुत्र राहुल दिवे, प्रशांत दिवे आणि पीपल्स रिपब्लिकनचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे, अनिल गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तथाकथित नेत्यांचा निषेध व्यक्त होत आहे.
विनायक पाठारे यांनी आयुष्यभर आपल्या लेखनीतून अन्यायाचा प्रतिकार केला. गीत लेखन, शाहिरी, लावणी, प्रबोधनात्मक गीते रचत त्यांनी अफाट काम केले. ते नाशिकमधील समतानगरमध्ये रहायचे. सोमवारी त्यांचे निधन झाले. तेव्हा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः रांगा लावल्या होत्या.
मात्र, त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी माणसाच्या अंगी असलेले शहाणपण तथाकथित कार्यकर्ते विसरले. खरे तर लोककवी बिरुद मिरवणारे पाठारे यांना आयुष्यभर उपेक्षा सहन करावी लागली. त्यांच्या मृत्यूनंतरही उपेक्षेसोबतच त्यांच्या देहाने इललोकीचा निरोप घेतला.
लोककवी पाठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी गोदातीरावरच्या अमरधाममध्ये कार्यकर्ते एकत्र आलेले. पाठारे यांना अग्निडाग दिला आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडले. ते इतके बेभान झाले होते की, त्यांनी सरणाची लाकडे उपसून हाणामारी सुरू केली. अनिल गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे आणि त्यांचे सहकारीविरुद्ध माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, जयेश सोनवणे, अनिकेत ऊर्फ पप्पू गांगुर्डे, पीपल्स रिपब्लिकनचे गणेश उन्हवणे, शशी उन्हवणे यांच्यात राडा झाला. या मारहाणीत गांगुर्डे पिता-पुत्र जखमी झाले. दोन्हीकडच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.नाशिकमध्ये घडलेल्या संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा आता राज्यात निषेध होऊ लागला आहे.याबाबतचे वृत्त टिव्ही 9ने दिले आहे