National Postal Week । भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन, असे आहे विविध कार्यक्रमांचे नियोजन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Indian Postal Department । भारतीय टपाल विभागातर्फे राष्ट्रीय टपाल सप्ताहाची (National Postal Week) आज 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून (World Postal Day 2022) सुरुवात झाली. हा सप्ताह 13 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालणार आहे. या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कर्जत उपविभागाचे उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख यांनी दिली.
1874 साली स्थापन झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या (UPU) वर्धापन दिनानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम “पोस्ट फॉर प्लॅनेट’ अशी आहे. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जनतेच्या जीवनात आणि विविध व्यवसायांच्या संदर्भात टपाल विभागाचे योगदान आणि विभागाच्या भूमिकेसंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा जागतिक टपाल दिनाचा उद्देश आहे. जनतेला सामाजिक आर्थिक घडामोडींची जाणीव करून देण्याचे हे एक साधन आहे. यावर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम “पोस्ट फॉर प्लॅनेट’ अशी आहे.
जागतिक टपाल दिन साजरा करण्याबरोबर एक पाऊल पुढे टाकत, भारतीय टपाल विभागाने राष्ट्रीय टपाल सप्ताह उपक्रमाचे आयोजन केले आहे. या द्वारे राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये टपाल विभागाची भूमिका आणि कार्याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.
या वर्षी राष्ट्रीय टपाल सप्ताहात काळाच्या बदलत्या गरजांनुसार साजरा केला जाणार आहे. उदा. बँकिंग आणि विम्याद्वारे प्रस्तुत केल्या जाणार्या विविध वित्तीय सेवांद्वारे सामान्य माणसाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी टपाल विभाग दिनांक 10.10.2022 रोजी “वित्तीय सशक्तिकरण” दिवस साजरा करणार आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यामधील – अगदी शेवटच्या माणसापर्यंत विविध सेवा पुरवून सामान्य माणसांच्या रोजच्या जीवनात भारतीय टपाल विभाग अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो आहे. टपाल विभागाचे सर्वसामान्यांच्या जीवनातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय टपाल सप्ताह उपक्रमामध्ये 13.10.2022 हा दिवस “अंत्योदय दिवस” म्हणून साजरा केला जाणार आहे.
राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध दिवसांचे कार्यक्रम खालीलप्रमाणे
- रविवार 9 ऑक्टोबर 202 : जागतिक टपाल दिवस
- सोमवार 10 ऑक्टोबर 2022 : वित्तीय सशक्तिकरण दिवस
- मंगळवार 11 ऑक्टोबर 2022 : फिलाटली डे: सेलिब्रेशन ऑफ आझादी का अमृत महोत्सव
- बुधवार 12 ऑक्टोबर 2022 : टपाल आणि पार्सल दिवस
गुरुवार 13 ऑक्टोबर 2022 : अंत्योदय दिवस
राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, आर्थिक सक्षमीकरणाबाबत प्रत्येक जिल्ह्यात मेळाव्यांद्वारे विविध स्तरांवर मोहिम; बँकिंग, फिलाटेली, विमा इत्यादिसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, टपाल विभागाद्वारे प्रदान केल्या जाणार्या विविध मेलिंग लॉजिस्टिक आणि सप्लाय चेंज मॅनेजमेंट सोल्युशन्सची ग्राहकांना माहिती देणारी कस्टमर मीट; आधार नोंदणी/नवीन आधार कार्ड तयार करणे, थेट लाभ हस्तांतरण, जन-धन योजना, सुकन्या समृद्धी खाती, AePS, इत्यादीसाठी “अंत्योदय दिवसा” मध्ये शिबिरे आयोजित केली जातील, असे कर्जत उपविभागाचे,उपविभागीय डाक निरिक्षक अमित देशमुख जामखेड टाइम्सशी बोलताना म्हणाले.