जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र पोलिस दलातील एका पोलिस निरीक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिस निरीक्षकाच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रविण विश्वनाथ कदम (वय 52) असे आत्महत्या केलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ते धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवार सायंकाळी कदम यांनी आपल्या निवासस्थानी पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी कदम यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये.
पोलिस निरीक्षक प्रविण कदम हे गेल्या तीन वर्षांपासून धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. येथील सह्याद्री बिल्डींगमध्ये ते एकटेच वास्तव्यास होते. तर त्यांचे कुटुंबीय नाशिकमध्ये वास्तव्यास होते.
पोलिस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी सायंकाळी प्रशिक्षणासह सांस्कृतिक कार्यक्रमाचा सराव व कार्यक्रमाचे ते प्रमुख असूनही उपस्थित नसल्याने चौकशी सुरू झाली. काही सहकाऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता निरीक्षक कदम यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा काही सहकारी निरीक्षक कदम यांच्या निवासस्थानी गेले. तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे केंद्रात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली.
निरीक्षक कदम यांनी सकाळीच अनेकांना गुड मॉर्निंगचे मेसेज पाठविले होते. यानंतर त्यांचा कुणाशीही कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नव्हता. केंद्रात ते कुणालाही दिसले नव्हते. घटनेची माहिती त्यांच्या नाशिकस्थित कुटुंबीयांना कळविण्यात आली.निरीक्षक कदम यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे.
निरीक्षक प्रविण कदम हे कलाकार, सर्पमित्र, वृक्षप्रेमी, मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना संगीत, गायनाची आवड होती. केंद्रात २१ नोव्हेंबरला होणाऱ्या दीक्षांत समारंभात सांस्कृतिक, संगीत कार्यक्रमाची जबाबदारी निरीक्षक कदम यांच्याकडे होती. घटनेमुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रासह पोलिस दलात हळहळ व्यक्त झाली.