Vidhan Sabha Nivadnuk 2024 : राजकीय पक्षांनो जरा इकडे लक्ष द्या, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून सहा महत्वाचे आदेश जारी, जाणून घ्या एका क्लिकवर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Vidhan Sabha Nivadnuk 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे. जिल्ह्यात निवडणूक निर्विघ्नपणे पार पडावी, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांनी सहा महत्वाचे आदेश जारी केले आहे. नेमकं काय आहेत हे आदेश ,चला तर मग जाणून घेऊयात. (Ahilya Nagar Ahmednagar News)
शासकीय कार्यालय परिसरात निवडणूक प्रचारास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स बॅनर्स पॅम्प्लेटस् कटआऊटस् किंवा जाहिरात फलक लावणे,
निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे, निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे इत्यादी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक काळात खाजगी वाहनांवर पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंध
निवडणूक कालावधीत खाजगी वाहनावर सक्षम प्राधिकारणाच्या पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे बोधचिन्ह लावण्यास निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय ऑटोरिक्षा, टेम्पो, मोटार सायकल व इतर खाजगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादींवर या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल, तसेच हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक काळात ध्वनीक्षेपकाच्या वापरास निर्बंध
निवडणूक कालावधीत निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत. ध्वनीक्षेपकाचा वापर संबंधित पोलीस विभागाच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत कोणत्याही क्षेत्रात तसेच फिरत्या वाहनांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
सर्व राजकिय पक्ष, उमदेवार व इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. ध्वनीक्षेपकाचे वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नामनिर्देश पत्र दाखल करतांना वाहनांच्या ताफ्यात तीनपेक्षा अधिक वाहने आणण्यास बंदी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतांना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त वाहने आणण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत.
नामनिर्देशन पत्र दाखल करतांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतांना कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणण्यास तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यातस प्रतिबंध घालण्यात आला आहे. हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईल वापरास बंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूक कालावधीत मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
निवडणूक निरिक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरिता नेमणूकीस असलेले मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व मतदार यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेशाकरीता प्रतिबंध करण्यात आला आहे.
या परिसरात खाजगी वाहन आणण्यास किंवा संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. हा आदेश २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चा, निदर्शनांना बंदी – जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निर्गमित केले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत. वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.