जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणा-या पात्र शेतक-यांना 31 ऑगस्ट पूर्वी e-KYC प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात e-KYC प्रक्रिया संदर्भात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा कृषि अधिक्षक शिवाजी जगताप, तहसिलदार सुनिता जराड उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात या योजनेच्या एकुण लाभार्थ्यांपैकी 61 टक्के इतक्याच पात्र शेतक-यांनी बँक खात्याची e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. 39 टक्के पात्र शेतक-यांनी अद्यापर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYCकरून घ्यावी. मुदतीमध्ये e-KYC प्रमाणिकरण न करणा-या शेतक-यांना जूलै 2022 नंतर या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते. याची संबंधित शेतक-यांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in. या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी. एम. किसान ॲपद्वारे OTO द्वारे लाभार्थींना स्वत: e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रवार e-KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.
केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रू. 15 फक्त निश्चित करण्यात आला आहे. या सुविधांचा लाभ घेऊन पात्र शेतक-यांनी 31 ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले आहे.