जामखेड टाईम्स वृत्तसेवा : दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झाले. (Pradip Bhide passes away)
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात मराठी दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं.मराठी बातम्या सांगण्याची खास शैलीमुळे ते अल्पवधीतच प्रसिद्ध झाले होते. त्यांचा भारदस्त आवाजामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते.
24 तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम होते.त्या काळात प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. १९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती.
तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते.त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.