अश्रुंचा महापुर : राज्यात पावसाने घेतले १२१ बळी !

NDRF च्या २६ तुकड्या महाराष्ट्रात दाखल

मुंबई, २३ जुलै :  संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसानं अक्षरशा: हाहा:कार माजलाय. राज्यातील अनेक भागात महापुराचा तडाखा बसलाय.अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यात ०८ ते १० ठिकाणी दरडी कोसळल्या घटना घडल्याने आतापर्यंत १२१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे.मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनांमुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कोकणातील चिपळूण आणि महाडमध्ये महापुराचं संकट ओढावलं असतानाच आता महाराष्ट्रावर दरडींनी मोठा घाला घातला आहे. रत्नागिरी, रायगड व सातारा जिल्ह्यात दरड कोसळून ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत.०३ जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे.

एकिकडे कोकण भागाला महापुराचा तडाखा बसलेला असतानाच आता सांगली, सातारा कोल्हापूर या भागातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे या भागालाही महापुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.नदीकाठच्या गावांमधील नागरिकांचे स्थलांतर वेगाने केले जात आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवत मोठे नुकसान केले आहे.

पुढील तीन दिवस रेड अलर्ट

हवामान विभागाने रायगड, पालघर. मुंबई ठाणे, पुणे सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. पूरग्रस्तभागात एनडीआरएफच्या १० पेक्षा अधिक टीम दाखल झाल्या आहेत. नौदल, आर्मी आणि कोसगार्ड सुद्धा दाखल झाले आहे. पुढील ०३ दिवस कोल्हापूर, पुणे रायगड, पालघर मुंबई आणि ठाण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये मागील ४८ तासात १०७४ मिली पाऊस झाला आहे. कृष्णा, कोयना, सावित्री आणि वेनाला पूर आला आहे. एका दिवसात कोयना धरणात १७ टीएमसी पाणी वाढ झाली आहे

NDRF च्या २६ तुकड्या महाराष्ट्रात दाखल

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या आठ आणखी तुकड्या या एअरलिफ्ट करण्यात आल्या. महाराष्ट्रातील पूराच्या संकटात मदतीसाठी एनडीआरएफ आणखी एक काही पथके तैनात करण्यात आली आहेत. कटक येथून या एनडीआरएफच्या तुकड्या आज एअरलिफ्ट करण्यात आल्या. येत्या तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांसाठी हवामान खात्यामार्फत रेड अलर्ट देण्यात आला आहे. हा रेड अलर्ट पाहता ही अतिरिक्त पथकांच्या नेमणुकीची तयारी एनडीआरमार्फत करण्यात आली. त्यानंतर या संपुर्ण टीमला एअरलिफ्ट करण्यात आले. एनडीआरएफच्या २६ चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-१७, दोन सी-१३० तसेच एक एमआय-१७ हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक चार चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात तीन, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी दोन, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी एक चमू तैनात आहे. कोलकाता आणि बडोदा येथून प्रत्येक चार चमू येत आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे.

 

सैन्यदल उतरले पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

तसेच भारतीय सैन्याच्या साऊदर्न कमांडच्याही १४ टास्क फोर्स या महाराष्ट्राच्या मदतीला धावून आल्या आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून बचावकार्य करण्यात येणार आहे.भारतीय सैन्याच्या १४ टास्क फोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि उर्वरीत महाराष्ट्रात ज्याठिकाणी पूरजन्य स्थिती आहे, अशा ठिकाणी बचावकार्यात मदत करण्यात येणार आहे. त्यामध्ये औंध मिलिटरी स्टेशन आणि पुणे इंजिनिअर टास्क फोर्सच्या माध्यमातून अन्न पूराचा फटका बसलेल्या भागात स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य, मदत आणि वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम करण्यात येणार आहे.

सांगली कोल्हापूर डेंजर झोनमध्ये ?

कोकणात कहर केल्यानंतर आता महापुराचं तांडव कोल्हापूर, सांगली या पट्ट्यात ट्रेलर दाखवू लागलं आहे. कोकणात ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. तर कोल्हापुरात पाण्याच्या वेढ्यातून लोकांना सोडवलं जातंय. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भीषण परिस्थिती आहे.