जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. येत्या 48 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून आज देण्यात आला आहे.
5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच भागात पाऊस जोर पकडणार आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, गोवा तसेच घाटमाथ्यावर येत्या दोन दिवसांत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जामखेड तालुक्यात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे, त्याच अजून जोर वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये ही येत्या 48 तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्याने महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने येत्या चार दिवसांसाठी आपला नवीन हवामान अंदाज आज सायंकाळी जाहीर केला. त्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येत्या चार दिवसात महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी असेच शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.