गडहिंग्लज, 04 जूलै 2023 : राष्ट्रवादीतील बंडामुळे राज्याचं राजकारण चांगलचं ढवळून निघालं आहे. गावागावात पारापारावर पावसाची चर्चा होण्याऐवजी राजकीय चर्चा रंगली आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतात पिकणार काय ? या चिंतेपेक्षा राष्ट्रवादीचं काय होणार याचीच चिंता गावगप्पांमध्ये रंगलीय, राजकीय गरमागरमीच्या या वातावरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलेलं एक वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.
शेतकरी चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माजी खासदार राजु शेट्टी यांनी राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य केलं आहे. देशपातळीवर भाजप आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीचा करून पाहिला, जनतेच्या हितासाठी प्रयोग करायच्या नादात आपलचं शेत नांगरायचं राहून गेलं, त्यामुळे आधी आपलं शेत नांगरतो,मशागत करतो, तरच पिक चांगलं येईल. त्यामुळे सध्या कुठल्याही आघाडीचा, प्रयोगाचा, नव्या राजकीय लग्नाचा विचार नाही, असे शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज भागात सध्या हे अभियान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरिल वक्तव्य केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आता एकला चलो चा नारा देत राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे इरादे त्यांनी स्पष्ट केले.
लग्नानंतर काही काळाने वैराग्य येतं, तसं अनुभवाअंती आम्ही सगळ्या आघाड्यांपासून संन्यास घेतलाय, त्यामुळे नव्या लग्नाचा सध्या विचार नाही, असे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.