Ram Shinde News : शाळेतील पोरं म्हणत्येत एका बबाचा फोटोय कंपास पेटीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या आडून सुरू असलेल्या प्रचारावर आमदार प्रा. राम शिंदेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । ०७ ऑक्टोबर २०२४ । “मी 10 वर्षे आमदार, मंत्री आणि पालकमंत्री होतो.पण मी कधीही कुठेही तुम्हाला म्हणलो नाही की अमूक माहिती द्या, हिच माहिती पाहिजे, तीच माहिती पाहिजे, अर्जंटच माहिती पाहिजे, अशी माहिती मी का नाही मागितली ? कारण, मला माहिती होतं की, माझ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि इतर विभागातील सर्व महिला कर्मचारी ह्या कर्तृत्ववान आणि कर्तव्यतत्पर आहेत. काही अडचण नाही, पण ज्याला शंका होती त्याने प्रश्न उपस्थित केले, त्याने तुम्हाला सातत्याने त्रास देण्याचं काम केलं, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवारांवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला.”
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, समुह साधन व्यक्ती (CRP), अंगणवाडी पर्यवेक्षिका, इतर सर्व कर्मचाऱ्यांचा रविवार दिनांक ६ रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडून सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. शिंदे यांनी दमदार भाषण करत उपस्थित महिला कर्मचाऱ्यांची मने जिंकली.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते प्रा मधुकर आबा राळेभात, जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, माजी सभापती डाॅ भगवान मुरूमकर, माजी उपसभापती रविंद्र सुरवसे, राष्ट्रवादीचे नेते प्रा सचिन सर गायवळ, तहसीलदार गणेश माळी, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी बांगर मॅडम, पंचायत समिती कृषि अधिकारी अशोक शेळके, शरद कार्ले, सोमनाथ पाचरणे, शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बाजीराव गोपाळघरे, सोमनाथ राळेभात, अशोक महारनवर, महारूद्र महारनवर, तात्याराम पोकळे, महालिंग कोरे, सुनिल यादव,उध्दव हुलगुंडे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष संजीवनीताई पाटील, दिपाली गर्जे, मनिषा मोहळकर, राणी उबाळे, संगिता पारे, सह आदी उपस्थित होते.
आमदार शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, समुह साधन व्यक्ती (CRP), अंगणवाडी पर्यवेक्षिका, इतर सर्व कर्मचाऱ्यांनी युध्द पातळीवर प्रयत्न केले नसते तर मतदारसंघातील सुमारे एक लाख तीन हजार दोनशे बारा महिलांना योजनेचा लाभ मिळाला नसता, तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली, या योजनेच्या समितीचा अध्यक्ष म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही केलेल्या कार्याची दखल घेणे हे माझे कर्तव्यच आहे, म्हणून आज तुम्हा सर्वांचा सन्मान आणि गौरव करण्याचा मी निर्णय घेतलाय. तुम्ही सर्वांनी घेतलेल्या कष्टामुळे सरकारची ही योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे, असे गौरवोद्गार यावेळी शिंदे यांनी काढले.
शिंदे पुढे म्हणाले की, भाऊ म्हणून भाऊबीजेला ओवाळणी देणं हे माझं कर्तव्यच आहे. लाडक्या भावाचं दुसरं काय काम असतं, मी थोडीच सावत्र भाऊय, दिल तर दिलं नाही नाही दिलं, लाडक्या बहिणीला साडी दिल्यावरच खऱ्या अर्थाने ओवाळणी होते. दुसऱ्यांसारखं छत्री बित्री दिल्यावर ती ओवाळणी होत नाही. दुसऱ्यांनी जी ओवाळणी दिली त्यावर फोटो लावलेत, पण आपण जी साडी देतोय त्या साडीला फोटो लावलेला नाही. असे म्हणत आमदार प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचे नाव न घेता खोचक टीका केली.
शाळेतील पोरं म्हणताच एका बबाचा फोटोय कंपास पेटीवर
“पाच वर्षापुर्वी शाळेत बिस्कीट, पॅड, चॉकलेट वाटले, त्याच्यावर परत पाच वर्षांनीच आता वेळ आली, मध्ये शाळांना कुलूपं लावले होते आणि पोरं पण शाळेत जात नव्हते मागच्या चार पाच वर्षांत, पाच वर्षांनीच पोरं शाळेत जायला लागली. आणि त्यांना थेट कंपास पेटी देण्यात आली आहे, असे म्हणत अलिकडे माझ्या दौर्यात मला लहान जास्त भेटत आहेत, मी मुलांना विचारतो की, कंपास पेटी मिळाली का? मुलं म्हणतात हो, मग पुढे मी त्यांना विचारतो कंपासपेटीत करकटक, पट्टी, कोनमापक, पेन्सिल, खोडरबर आहे का ? ते म्हणतात नाही, मग मी पुढे विचारतो, कंपास पेटीवर एका बबाचा फोटो आहे का? ते म्हणतात हो आहे आहे एका बबाचा फोटो कंपास पेटीवर, असा प्रसंग सांगत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांचा शालेय विद्यार्थ्यांच्या आडून सुरू असलेल्या प्रचाराचा जोरदार समाचार घेतला.”
मी तसा भाग्यवान अन् वाचासिद्धी असणारा
पुढे बोलताना आ. शिंदे म्हणाले, की मी तसा भाग्यवान अन् वाचासिद्धी असणारा आहे, कारण विधानसभेत जे प्रश्न उपस्थित केले, त्यावर शासनाने शिक्कामोर्तब केले. आता समुह साधन व्यक्तींचा प्रश्न राहिला आहे. त्यासाठी वेळ आणि काळ यावा लागतो, यासाठी आपल्याला सिध्द व्हावे लागेल, कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल, नाहीतर कुण्यातरी तरी गाड्या भरून यात्रेला पाठवण्यासाठी आपण रात्र रात्र जागत आहात, हे चालणार नाही.
शासनाचं काम करून, बघा कसा गुण येतो, शासनाचे सगळ्यांकडं बारिक लक्ष असतं, त्यामुळे आपला स्वाभिमान आणि अभिमान गहाण ठेवायचं काम करायचं नाही, आपलं एकच लक्ष असलं पाहिजे शासनाने आपल्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, त्यासाठी आपण स्वता:सिध्द केलं पाहिजे. शासनाचे काम जे लोक इमानदारीने करतात त्यांची शासन दखल घेते. विधानसभेला पडल्यावरही मला पक्षाने पुन्हा आमदार केले, ही माझ्या कामाची पावती असल्याचे आ. शिंदे म्हणाले.
हक्काने तुमच्या लाडक्या रामभाऊला आवाज द्या, तुमच्यावर कोणतही संकट येऊ देणार नाही
शिंदे पुढे म्हणाले, तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या, कुठलिही परिस्थिती येऊ द्या, तुम्हाला कुठलीही मदत लागु द्या, हक्काने तुमच्या लाडक्या रामभाऊला आवाज द्या, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहिल, तुमच्यावर कोणतही संकट येऊ देणार नाही, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या, अशी भावनिक साद यावेळी शिंदे यांनी घातली.