Ram Shinde Sabhapati : विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती प्रा राम शिंदे (ram shinde mla) यांचे आज २९ डिसेंबर रोजी आपल्या चोंडी (chondhi) या जन्मगावी आगमन झाले. सभापती झाल्यानंतर ते प्रथमच कर्जत जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघाच्या दौर्यावर आज आले आहेत.यावेळी चोंडी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून प्रा राम शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जन्मभूमीने केलेल्या भव्यदिव्य स्वागताचे राम शिंदे हे चांगलेच भारावून गेले होते. (Jamkhed News today live)

विधान परिषद सभापती प्रा राम शिंदे यांचे रविवारी पहाटे ६ वाजता श्री क्षेत्र चोंडी या जन्मगावी आगमन झाले. शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी चोंडी ग्रामस्थ, कार्यकर्ते व शिंदे कुटूंबातील सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ९ वाजता प्रा राम शिंदे यांची चोंडी गावातून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत प्रा राम शिंदे यांच्यावर फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी भूमिपुत्राचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. त्यानंतर १० च्या सुमारास प्रा राम शिंदे हे आपल्या कुटुंबियांसमवेत अहिलेश्वर मंदिरात दाखल झाले.याठिकाणी त्यांनी पत्नी आशाताई शिंदे, आई भामाबाई शिंदे व इतर सदस्यांच्या उपस्थितीत अभिषेक घातला.

यावेळी प्रा राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे दर्शन घेत आशिर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात भेट देत अभिवादन केले. त्यानंतर पुन्हा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिंदे समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला. त्यानंतर ही मिरवणूक शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाली.

यावेळी विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला.शिंदे यांचा सत्कार करून त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी शिंदे समर्थकांची जोरदार झुंबड उडाली होती. सर्वांचा सन्मान स्वीकारल्यानंतर प्रा राम शिंदे हे कर्जत शहराकडे रवाना झाले.

प्रा राम शिंदे यांची विधीमंडळ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर निवड झाली. यामुळे चोंडीसह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिंदे यांनी स्व कर्तृत्वावर घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे चोंडी ग्रामस्थ चांगलेच भारावून गेले होते.

शिंदे यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांच्या लेझीम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. गावातील आबालवृद्ध बाया बापडे व तरूण़ाई भूमिपुत्राच्या स्वागतासाठी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सर्वांनी गावच्या लाडक्या लेकाचं भव्य स्वागत केले.
