2023 च्या खरीप हंगामातील उर्वरित Pik Vima मंजुर, अहमदनगरसह राज्यातील 6 जिल्ह्यांना मिळणार 1927 कोटी रुपयांची नुकसान भरपाई – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. १ : ‘सर्वसमावेशक पीक योजने’अंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील अहमदनगर नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १९२७ कोटी रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महायुती सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात बीड पॅटर्न आधारित पीक विमा योजना राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या ११०% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी ११०% पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप हंगाम २०२३ मधील मंजूर ७,६२१/- कोटी रुपये पैकी विमा कंपनी मार्फत ५४६९/- कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले होते.
तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी १९२७ कोटी रुपये ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती. ही रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत ३० सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
राज्यातील नाशिक रु.६५६/- कोटी, जळगाव ₹४७०/- कोटी, अहमदनगर ₹ ७१३/- कोटी, सोलापूर ₹२.६६ कोटी, सातारा ₹२७.७३ कोटी व चंद्रपूर ₹ ५८.९० कोटी असे एकुण १९२७ कोटी रुपये सहा जिल्ह्यांना दिले जाणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
बातमी सोर्स – जिल्हा माहिती कार्यालय, अहमदनगर