Republic Day 2022 news । प्रजासत्ताक दिन सोहळ्याला राज्यात लागले गालबोट, चार ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Republic Day 2022 news । राज्यात प्रजासत्ताक दिन सोहळा, मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, या सोहळ्याला राज्यात चार ठिकाणी गालबोट लागले. विविध मागण्यांसाठी बीड, हिंगोली आणि सातारा या ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
प्रजासत्ताक दिनी करण्यात आलेल्या आत्मदहनाच्या अंदोलनात हिंगोली येथील एक तरूण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. (Attempted Self Immolation ) राज्यात आत्मदहनाचे अंदोलन विविध ठिकाणी झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मानवाधिकार कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्महदनाचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. मिलिंद प्रधान असे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवला तसेच तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सेनगाव येथील अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी मिलींद प्रधान या कार्यकर्त्याने केली होती. मात्र त्या मागणीकडे लक्ष न दिल्याने प्रधान याने टोकाचे पाऊल उचलत प्रजासत्ताक दिन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यात तो गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
साताऱ्यात ज्योती नलावडेने केला आत्मदहनाचा प्रयत्न
सातारा – जावली बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ज्योती नलावडे या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्योती नलावडे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बील न मिळाल्याने तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
बीड – ध्वजारोहणानंतर धारुर येथील तहसील कार्यालयात तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पवन तट असे त्या तरुणाचे नाव आहे. पवन याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. कोरोना काळात रुग्णांना बेड, बेडशीट पुरवले होते. मात्र बील न मिळाल्यामुळे त्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता तरीही प्रशासनाने त्याला त्याचा मोबदला दिला नव्हता, यामुळे चिडलेल्या पवनने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
बीड शहरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
बीड पोलीस मुख्यालयावर एका युवकाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.तिरंगा झेंड्याच्या समोरच अंगावर डिझेल ओतून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला.
बीड शहरातील पंचशील नगर भागातील रस्त्याच्या बोगस कामाची तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे युवकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.टेंडर काढून,पैसे खाऊन बोगस रस्ते बनवणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने युवकाने डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सदर इसमाचे नाव विनोद शेळके असून मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आणि झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे.दरम्यान,पोलीस घटनास्थळी असून अधिक तपास सुरू आहे. युवकाने ‘तक्रार दिली तर चौकशी करू’ असा खुलासा मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर केला आहे.