Republic Day 2025 : अभिमानास्पद! प्रजासत्ताक दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे विधान भवनासमोर ऐतिहासिक भाषण, 10 मिनिटांच्या भाषणात शिंदे नेमकं काय म्हणाले ? वाचा संपुर्ण भाषण
Ram Shinde Sabhapati Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई विधान भवनात ध्वजारोहण सोहळा पार पडला.विधानपरिषदेचे सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रा राम शिंदे (Ram Shinde MLA) यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण आज पार पडले. हा ऐतिहासिक क्षण कर्जत-जामखेड मतदारसंघातील लाखो जनतेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला. यावेळी सभापती प्रा राम शिंदे (Ram Shinde Sabhapati) यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी प्रा राम शिंदे नेमकं काय म्हणाले ? पाहूयात. (Ram Shinde Republic Day Speech)

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील विधान भवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या यांच्या हस्ते आज सकाळी ८ वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी प्रा राम शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय राज्यघटना अमृतमहोत्सवाच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) श्री. जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी केलेले ऐतिहासिक भाषण खालील प्रमाणे
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ निलमताई गोऱ्हे, सन्माननीय विधानपरिषद सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डाॅ विलास आठवले, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि बंधु भगिनींनो… सर्वप्रथम आपणा सर्वांना अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज आपण भारतीय प्रजासत्ताकाची ७५ वर्षे आपण यशस्वीपणे पुर्ण केली आहेत.२६ जानेवारी १९५० साली आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वीकारत भारतीय प्रजासत्ताकाचा प्रारंभ करण्यात आला. भारताची राज्यघटना आणि राज्य घटनेच्या माध्यमांतून निर्माण झालेली संसदीय लोकशाही प्रणाली याद्वारे भारताची सर्वांगिण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरु आहे.

देशवासियांचे हक्क सुरक्षित ठेवणारी आपली राज्यघटना आणि त्यादृष्टीने जागरूक भारतीय नागरिक अश्या दोघांना याचे श्रेय जाते. सामाजिक आणि आर्थिक न्यायाची प्रस्थापना, सर्वसमावेशी विकासाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण या दिपस्तंभाच्या दिशेने परस्परांमधील बंधुभाव जपत सदैव कार्यतत्पर राहूया.

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारताची राज्यघटना विश्वस्तरावर उल्लेखनीय आणि गौरवास्पद ठरलेली अशी राज्यघटना आहे. आपली ही राज्यघटना स्विकारल्याच्या ऐतिहासिक पर्वाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. त्यासाठी देखील आपले अभिनंदन आणि शुभेच्छा !

१९४७ साली ब्रिटीशांच्या जोखडातून भारताबरोबरच अनेक देश स्वातंत्र्य झाले.परंतू भारताप्रमाणे इतर देशात संसदीय लोकशाही व्यवस्था म्हणावी तशी मुळ धरू शकली नाही. याउलट भारतीय लोकशाहीचे उदाहरण विश्वस्तरावर गौरवाने दिले जाते. हे केवळ आणि केवळ भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेमुळेच शक्य झाले आहे.

मला सांगताना विशेष आनंद होत आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे १९२६ ते १९३७ या काळात मुंबई विधान परिषद (Legislative Council) चे सदस्य होते. त्यानंतर १९३७ मध्ये ते विधानसभा सभागृहाचे सभासद झाले.
डिसेंबर २०२४ च्या नागपुर हिवाळी अधिवेशनाचे कामकाज आपण यशस्वीपणे पार पाडले. या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयके संमत करण्यात आली. लोकहिताच्या प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.राज्य सरकारमार्फत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, राज्यातील तरूण तरूणींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, या सारख्या अनेक योजनांचे मी स्वागत करतो आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो.
दावोस येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक परिषदेतून महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार झालेले आहेत. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्टअप या यशस्वी उपक्रमास ९ वर्षे पूर्ण झाले आहेत. तरुणांमधील नवउदमशिलतेला त्यामुळे प्रोत्साहन मिळत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अलीकडेच दोन उपग्रहांच्या डाॅकिंगचा प्रयोग यशस्वीपणे पार केला.अमेरिका, रशिया आणि चीननंतर आपल्या देशाने ही कामगिरी पार पाडली आहे. शास्त्रज्ञांच्या या यशाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.
देशातील आणि राज्यातील गरिब आणि वंचित घटक, माता आणि भगिनी, युवा वर्ग, शेतकरी अश्या सर्व समाज घटकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसमावेशी विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आणण्यात येत आहे. अमृतकाळ पर्वात महाराष्ट्र विधिमंडळ लोककल्याणाचा विचार दीपस्तंभासारखा सदैव डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करील अशी मी ग्वाही देतो.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. त्यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे असे आहे,छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमांतून लोककल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याचा हा विचार, प्रजाहितदक्ष कारभाराचा आदर्श सर्वांपुढे निर्माण करून पुढे नेला. त्यांचे कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहिल. त्यांच्या माहेरच्या वंशातील मी एक घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मृती मी अभिवादन करतो.
लोककल्याणाचा विचार दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर समोर ठेवून आपले विधानमंडळ वाटचाल करीत आहे. अगामी काळात विधानमंडळाचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास विनाव्यत्त्यय होणे, समिती पध्दत अधीक सक्षम करणे, चर्चेनंतरच विधेयक संमत होणे आणि अर्थसंकल्पीय बाबींवर सदस्यांना मार्गदर्शन, ही आपली पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज अग्रक्रमासाठी चतु:सुत्री राहिल.
कायदा निर्मिती हे विधिमंडळाचे अंगभूत महत्वाचे कार्य आहे. देशपातळीवर अनुकरणीय ठरलेले कायदे हे आपल्या विधिमंडळाचे वैशिष्ट्ये आहे. कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सन्माननीय सदस्यांचा सक्रीय सहभाग असावा. तसेच महत्वाचे विधेयक विनाचर्चा संमत होऊ नयेत या दृष्टीकोनातून कारवाई करूया,
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी राज्य या संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती होय. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सन्माननीय सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करूया.
पाटणा येथे नुकतीच ८५ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधिमंडळे जनतेच्या प्रति अधिकाधिक उत्तरदायी व्हायला हवीत याकडे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे समिती पध्दत आणखी प्रभावी होण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
आपल्या प्रजासत्ताकाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित रहावे यादृष्टीने देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो.
सर्वांना पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
चला समर्थ, सुरक्षित आणि सर्वांगिण भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया !
जय हिंद.. जय महाराष्ट्र !!