जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 2024 नंतर राष्ट्रवादीचे सुत्रे कोणाच्या हाती असतील यावर आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना मोठे भाष्य केले होते. यावर आता रोहित पवारांनी युटर्न घेतला आहे. मात्र हे करत असताना त्यांनी माध्यमांवर आगपाखड केली आहे.
आमदार रोहित पवार यांची एक फेसबुक आता चर्चेत आली आहे. त्यात म्हटले आहे की, अनियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहे. अशा परीस्थितीत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवावर्गाच्या सक्रीय सहभागाशिवाय लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही.
आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रीय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळ हा युवांचा असेल, असं म्हणालो
परंतु या वक्तव्याचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला तर किती मोठी बातमी होते, याचा प्रत्यय काल काही माध्यमांनी दिलेल्या बातम्या पाहून आला. उलट अनेकदा लोकहिताची कामं करताना ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं असतं, पण त्याची म्हणावी तशी दखल घेतली जातेच असं नाही.
मी कोणत्याही पक्षातील पदांबाबत बोललो नाही. पण लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमदार, खासदार, जि.प. सदस्य, नगरसेवक म्हणून युवांनी केवळ चांगल्या विचारांच्या लोकांनाच निवडून देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
शिवाय सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्या सरकारला युवांकडं दुर्लक्ष करता येणार नाही तर सशक्त युवा धोरण आखून ते राबवावं लागणार आहे. या माध्यमातून येणारा काळ आपला म्हणजेच लोकशाही विचारांचा आणि युवांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा असेल, यात शंका नाही असे रोहित पवार म्हणाले.