रोहितदादा मी घरी कशी जाऊ, काहीतरी करा पटकन : आष्टी तालुक्यातील चिमुकल्या मुलीची आमदार रोहित पवारांना साद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । यंदा भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दणक्यात साजरा होत आहे. जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची स्वप्ने रंगवली जात आहेत, मात्र याच देशातील लेकरांना शिक्षणासाठी आजही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे अनेक घटनांतून सातत्याने अधोरेखित होत आहे. अशीच एक घटना बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील एका गावातून समोर आली आहे.
अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी गावात चौधरी आणि पावशे वस्ती वसली आहे. याच वस्तीवरील चिमुकल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शाळा सोडण्याची वेळ आली आहे, कारण हे विद्यार्थ्यी ज्या बॅरल आणि ट्यूबच्या सहाय्याने नदी पार करून शाळेत जातात ते जप्त करत फोडून टाकण्यात आले आहेत. हे कृत्य कोणी समाजकंटकांनी नव्हे तर प्रशासनाने केले आहे. यामुळेच विद्यार्थ्यांचा शाळेत जायचाच मार्ग बंद झालाय.
आष्टी तालुक्यातील हिंगणी या गावात चौधरी आणि पावशे वस्ती आहे. या वस्तीवरील विद्यार्थ्यांना गावातील शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील नागलवाडी या कर्जत तालुक्यातील गावात शिक्षणासाठी जावे लागते. गेल्या बारा वर्षांपासून सीना नदी पार करून शाळेत जाणे येथील लेकरांच्या नशीब आलयं. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यावर जीव धोक्यात घालून लेकरांना शाळेत जावे लागते.
नुकतेच नागलवाडी हद्दीत कर्जत तहसील प्रशासनाने कारवाई करत विद्यार्थी ज्या बॅरल आणि ट्यूबच्या सहाय्याने नदी पार करून शाळेत जातात ते जप्त करत फोडून टाकण्याची कारवाई केली आहे. मुले नागलवाडीच्या शाळेत असताना ही कारवाई झाली. यामुळे आता घरी जायचं कसं असा प्रश्न मुलांना पडला होता, घटनेनंतर पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत आष्टी तहसील कार्यालयावर धडक देत आपले गाऱ्हाणे मांडले.
हिंगणीतील चौधरी आणि पावशे वस्तीवरील नागरिक गेल्या 12 वर्षांपासून रस्त्यासाठी संघर्ष करत आहेत, रस्ता झाल्यास येथील विद्यार्थी हिंगणीच्या शाळेत जातील. आता विद्यार्थी आणि पालकांनी थेट कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडेच आपली कैफियत मिडीयाच्या माध्यमांतून मांडत न्याय देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे video सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
एका व्हिडिओत साहेब, साहेब, आम्ही आमची मुलं आडाणी ठेवायचे का ? सांगा बरं तुम्ही असा टाहो फोडताना एक हतबल बाप दिसत आहे. हा बाप अधिकाऱ्यांना उद्देशून या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. तसेच एक मुलगी आपली कैफियत मांडत असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. यातून ती रोहितदादा मी घरी कशी जाऊ, काहीतरी करा पटकन अशी साद घालताना दिसत आहे.
आमदार रोहित पवार या गंभीर प्रश्नावर तोडगा काढतील का ? आष्टी तालुक्यातील चिमुकल्यांना न्याय मिळवून देतील का ? याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.