Chandrasekhar Azad Firing News : भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर प्राणघातक हल्ला, अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार, चंद्रशेखर आझाद यांच्यावर उपचार सुरु !
उत्तर प्रदेश : Chandrasekhar Azad Firing News : भीम आर्मी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आंबेडकरवादी चळवळीतील देशातील महत्वाचे तरूण नेते चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथं देवबंद परिसरात हा हल्ला झाला. अज्ञातांनी रावण यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. सुदैवानं आझाद यांना गोळी लागली नाही, मात्र छर्रे लागल्यामुळं ते जखमी झाले आहेत. त्यांना देवबंद येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती ठिक असल्याचं डाॅक्टरांनी म्हटलं आहे. (Saharanpur news)
सहारनपूर पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली. आझाद हे आपल्या कारनं देवबंदचा दौरा करत होते. त्याचवेळी हल्लेखोरांची कार त्यांच्या जवळ आली. त्यातून रावण यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. एकूण चार राउंड फायर करण्यात आले. ही कार हरयाणा राज्याच्या क्रमांकाची होती. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. त्यांचा शोध सुरू आहे. आझाद यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या जिवाला धोका नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू आहे. हल्लेखोरांची गाडी बराच वेळ आझाद यांच्या कारचा पाठलाग करत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सोशल मिडीयावर या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
कोण आहेत चंद्रशेखर आझाद?
चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील आहेत. वकील असलेले आझाद आंबेडकरी विचारांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय युवा नेते आहेत. २०१४ साली आझाद यांनी विनय रतन सिंह व सतीश कुमार यांच्या साथीनं भीम आर्मीची स्थापना केली. ही संघटना उत्तर भारतातत शिक्षणाचं काम करते.या संघटनेच्या वतीनं मोफत शाळा चालवल्या जातात. आझाद यांनी आझाद समाज पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला असून ते या पक्षाचे अध्यक्ष आहेत. देशभरात आझाद यांना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेषता: दलित बहूजन समाजातील तरूणांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे.