जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवार, दि २२ पासून प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी ९ जणांनी एकूण १८ उमेदवारी अर्ज नेले आहे. यापैकी एक उमेदवार अर्ज दाखल झाला आहे, अशी माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली.
राज्याचं लक्ष लागून असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी कर्जत तहसील कार्यालय निवडणुकीचे मुख्यालय आहे. याच ठिकाणाहून उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवार, दि २२ पासून उमेदवारी अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल प्रकियेला सुरूवात झाली.
मंगळवारी दिवसभरात ९ जणांनी १८ उमेदवारी अर्ज नेले. यापैकी सतीश शिवाजी कोकरे (खातगाव टाकळी ता.करमाळा) बाहेरच्या जिल्ह्यातील पहिल्या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत पाचच व्यक्तींना प्रवेश आहे, निवडणूक आयोगाकडून याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.