Domri Patoda Beed : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत डोक्याला बांधलेल्या स्कार्फने एका महिलेचा जीव घेतला आहे.ऊन लागू नये म्हणून एका महिलेने डोक्याला स्कार्फ बांधला खरा पण त्या महिलेचं डोकं धडावेगळं झालं. उन्हापासून वाचण्यासाठी डोक्याला स्कार्फ बांधताच महिलेचा मृत्यू झाला.या भयंकर घटनेने मोठी खळबळ उडाली.
फेब्रुवारीत महिना संपत आला आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे.शेतात काम करणारे शेतकरी उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला रूमाल, पंचा बांधत आहेत, याशिवाय महिला शेतकरी डोक्याला स्कार्फ बांधून शेतात काम करताना दिसू लागले आहेत. शेतात काम करताना उन्हाचा चटका लागू नये यासाठी पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील अंजना श्रीधर जगताप (वय 55) यांनी डोक्याला स्कार्फ बांधला होता. पण तो त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला.
डोमरीत शेतकरी सध्या ज्वारी, गहू हरभऱ्याचे खळे करण्यात व्यस्त आहेत. यासाठी मळणीयंत्र लावले जाते. अंजनासुद्धा तिथंच काम करत होत्या. काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटलं आणि मळणीयंत्रात अडकलं. वेगाने सुरू असलेल्या यंत्रणानं अंजना जगताप यांना खेचलं. अंजना यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं आणि धडावेगळं झालं. काही समजण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.याबाबतचे वृत्त न्यूज 18 लोकमत एक दिले आहे.
सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतात कामे सुरू आहेत. उन्हाचा चटकाही वाढला आहे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. डोमरी गावातील अंजना जगताप यांचा मृत्यू सर्वांना चटका लावणारा आहे. दोन दिवसांपुर्वी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्याला बांधलेला स्कार्फ, रूमाल, पंचा हाही जीवघेणा ठरू शकतो हेच डोमरी गावातील घटनेवरून स्पष्ट होत आहे. मळणी यंत्रासमोर काम करताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मळणी यंत्रामुळे दरवर्षी अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात नाहक शेतकऱ्यांचा बळी जात आहे. मळणी यंत्रासमोर काम करताना बर्याचदा लहान मुलांना वापर होतो. तो थांबवण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, डोमरी येथील महिला शेतकरी अंजना जगताप यांचा मळणी यंत्रात डोके अडकून मृत्यू झाल्याने जगताप कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे डोमरी गावावर शोककळा पसरली आहे.