खळबळजनक : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा बळी, मालेगाव तालुक्यातील पोहणे गावात गुप्तधनासाठी 9 वर्षीय बालकाचा नरबळी, भोंदूबाबासह चौघा जणांना अटक !
नाशिक : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एका 9 वर्षीय मुलाचा नरबळी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोल आला आहे. ही घटना मालेगाव तालुक्यातील पोहणे या गावात घडली आहे. या घटनेने नाशिक जिल्हा पुरता हादरून गेला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील भोंदूबाबासह चौघांना बेड्या ठोकण्याची कारवाई पोलिसांनी पार पाडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, मालेगाव तालुक्यातील पोहणे या गावातील रमेश लक्ष्मण मोरे याच्या अंगात येऊन तो भोंदूगिरी करत होता. रमेश याने आपल्या शेतातील विहिरीजवळ गुप्त धन असल्याचे रोमा बापु मोरे, लक्ष्मण नवल सोनवणे, गणेश लक्ष्मण सोनवणे, उमाजी गुलाब मोरे यांना सांगितले. गुप्तधन मिळवायचे असेल तर एका बालकाचा नरबळी द्यावा लागेल असे रमेशने सर्वांना सांगितले होते. त्यानुसार चाॅकलेटचे आमिष दाखवून कृष्णा सोनवणे या बालकाचे गेल्या आठवडापुर्वी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर कृष्णाचा बळी देण्यात आला. मयत कृष्णाचा मृतदेह त्यांनी एका शेतात पुरला.
मयत कृष्णा हा 16 जूलै रोजी शेतात जातो म्हणून घरातून गेला होता. परंतू तो घरी परतला नव्हता. त्यामुळे कृष्णाच्या पालकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलिस कृष्णाचा शोध घेत होते.
वनविभागाच्या हद्दीतील एका विहिरीजवळील जागेत दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काहीतरी संशयास्पद असल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी उकरले असता कृष्णा सोनवणे याचा पुरलेला मृतदेह आढळून आला. यावेळी शवविच्छेदन केले असता त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले. मयत कृष्णा याची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. ही घटना 18 जूलै रोजी उघडकीस आली होती.
कृष्णा सोनवणे याची हत्या नरबळीतून झाली असावी असा संशय पोलिसांना आला हौता. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. कृष्णा याची हत्या नरबळीच्या प्रकारातून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणात भोंदूबाबासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण फरार आहे, त्याचा कसून शोध घेतला जात आहे. लवकरच तो गजाआड होईल, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात अंधश्रद्धा, बुवाबाजी विरोधात कायदा होऊनही सर्रासपणे अंधश्रद्धेच्या घटना घडत आहेत. भोंदूबाबांच्या नादी लागून समाजात अप्रिय घटना घडत आहेत. मालेगाव तालुक्यात एका 9 वर्षीय बालकाचा याच अंधश्रद्धेने हकनाक बळी घेतल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. कृष्णा सोनवणे या 9 वर्षीय बालकांच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.