जामखेड टाइम्स वृत्तसेवा । खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आकड्यांच्या खेळामध्ये कोणाचा विजय होणार याचा फैसला होणे अजून बाकी आहे. त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत शिवसेनेचे धनुष्यबाणचिन्ह गोठवण्याचा फैसला घेेतला. त्याचबरोबर पक्षाचे नाव वापरण्यावर दोन्ही गटांवर बंदी आणली आहे. हा निर्णय जरी तात्पुरत्या स्वरूपाचा असला तरी, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी हा निर्णय दोन्ही गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आता शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या गटाच्या नावाबाबत उध्दव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना आपल्या गटाचे नवे नाव निवडणूक आयोगाकडे नोंदवावे लागणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या गटाचे नवे नाव काय ठेवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचे नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी मागणी ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत केली आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नविन चिन्ह ठरवण्यासाठी ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार शिवसेनेने आपल्या गटासाठी काही नाव ठरवली आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकासाठी निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना आपापली चिन्हे ठरवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे आपापल्या गटाचं नवीन नावही दोन्ही गटांना ठरवावं लागणार आहे.
त्यानुसार ठाकरे गटाकडून ही संभावित नावं होती. 1) शिवसेना बाळासाहेब ठाकरे 2) शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
3) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन संभावित नावांपैकी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ (Shivsena Balasaheb Thackeray) हे नाव आपल्या गटासाठी उद्धव ठाकरे यांनी निवडलं आहे. तसेच१) त्रिशुल २) उगवता सुर्य ३) मशाल या तीन संभावित चिन्हांपैकी त्रिशूल चिन्हाची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला तसं पत्रही शिवसेनेनं लिहीलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
- उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, फ्री चिन्हांच्या यादीत त्रिशूळ समाविष्ट नसले तरी त्रिशूळ चिन्ह वापरण्याबाबत कायदेशीर अडचण नाही.
- निवडणूक आयोगानंही त्रिशूळ वापरता येत नसल्याचे कोणतेही गाईडलाईन्स दिले नाहीत.
- वाहन तसेच इतर चिन्ह शिवसेनेला लागू होत नाहीत.
- त्रिशूळ चिन्ह देशात कोणत्याही राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाकडे नाही.
- शिवसेनेची विचारधारा, आचार विचार आणि तत्वाला साधर्म्य असे चिन्ह त्रिशूळ आहे.
- महत्वाचं म्हणजे ही तीनही चिन्ह हिंदू धर्माशी निगडीत आहेत.
दरम्यान केंद्रीय निवडणुक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना उद्या, म्हणजे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत आपापलं चिन्ह निवडण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पहावं लागेल