जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात उध्दव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टिपेला पोहचला आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण आणि शिवसेना नावावर तात्पुरता हातोडा मारला गेला. त्यानंतर नाव आणि चिन्हाबाबतचे पर्याय निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आले. त्यानुसार आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल (mashal symbol) हे चिन्ह बहाल केले आहे.
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह जाहीर झाल्यानंतर काही क्षणात सोशल मिडीयावर मशाल चिन्ह झळकले. दरम्यान शिवसेनेचा आणि मशाल चिन्हाचा काही इतिहास आहे का ? तर त्याचं उत्तर हो असेच आहे. कारण शिवसेनेला 1985 साली मशाल हे चिन्ह मिळाले होते.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ जेव्हा शिवसेनेत होते त्यावेळी त्यांनी नगरसेवकपदासाठीची निवडणूक मशाल या चिन्हावर लढवली होती. तसेच 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच याच चिन्हावर 1989 साली मोरेश्वर सावे हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार औरंगाबाद मतदारसंघातून विजयी झाले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1985 साली बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यावेळी पण मशाल हे चिन्ह मिळाले होते. याच चिन्हावर शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली होती.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ गटासाठी ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबाला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत 1985 चा राजकीय करिष्मा करण्याची संधी पुन्हा आली आहे, अशीच चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.