धक्कादायक : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघा चिमुकल्यांचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटनेने अहमदनगर जिल्ह्यात उडाली खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे धुमसशान सुरु आहे. अश्यातच वादळी पावसामुळे तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजेचा शाॅक बसल्याने मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विजेचा शाॅक बसल्याने चार चिमुकल्यांचा मृत्यू होण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील (येठेवाडी) खंदरमाळ गावातून समोर आली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर मुले आदिवासी कुटुंबातील असून घरची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे.
संगमनेर तालुक्यातील (येठेवाडी) खंदरमाळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वांदरकडा येथील परिसरातून गेलेल्या विद्युत वाहिनीची तार तुटली. या वाहिनीला विद्युत प्रवाह सुरू होता. घरापासून काही अंतरावर तळ्याजवळ अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजेच्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.८) वांदरकडा (येठेवाडी) येथे दुपारच्या सुमारास घडली
दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५), अनिकेत अरुण बर्डे (वय ६), ओंकार अरुण बर्डे (वय ७) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. ते येठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. हे चौघे शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी गेले. दुपारच्या वेळी ते खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, अंघोळ करत असताना तळ्यावरून गेलेल्या तुटलेल्या वीजवाहक तारेचा विद्यूत प्रवाह पाण्यात उतरला, शॉक लागून यचारीही भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमनेर तालुका हादरून गेला आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस कर्मचारी राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे आदींसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही भावंडांचे मृतदेह तळ्यातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शव विच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात आणण्यात आले असल्याची माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
तलावाकडे जाणारा रस्ता पावसामुळे अतिशय खराब झाला असून या खराब रस्त्यामुळे चारही बालकांचे मृतदेह झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले. नागरिकांनी वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. दुर्दैवी घटनेत एकाच वेळी चार बालकांचा मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बालकांच्या आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी असलेल्या अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.