धक्कादायक : पैसे-दागिणे घेऊन नवविवाहित नवर्या होत आहेत फरार, कर्जत- जामखेडसह राज्यात बनावट विवाहाचे रॅकेट सक्रीय, अनेकांची होत आहे फसवणूक, पोलिस ढाराढूर तर फसवणूक झालेले चिडीचूप !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। fake marriages racket in maharashtra। मागील काही वर्षांत झालेल्या बेसुमार स्त्री भ्रूण हत्येमुळे महाराष्ट्रात मुलींचे जन्मदर घटले.याचा सर्वाधिक तोटा आता समाजातील प्रस्थापित वर्गांसह सर्वच समाज घटकांना बसत आहे. लग्नाळू मुले जास्त अन् मुलींचा तुटवडा अशी परिस्थिती आहे. ज्या काही लग्नाळू मुली आहेत, त्यांचे मायबाप आपल्या लेकीचं भविष्य सुरक्षित घरी जावं यासाठी नोकरदार मुलगा आणि शेती असेल तरच सोयरीक करताना दिसत आहेत.यामुळे अनेक तरुणांची लग्ने रखडत आहेत.वय उलटून गेले तरी लग्न न झालेले तरूण मग मिळेल त्या जाती-धर्माच्या मुलींसोबत गुपचुप संसार थाटत आहेत. पण काहींसोबत यात फसवणूक होत असून बनावट विवाहाचे प्रकार संबंध महाराष्ट्रभर वाढू लागले आहेत. (fake wedding racket)
स्त्री भ्रूण हत्येमुळे संबंध महाराष्ट्र भर मुलींचा जन्मदर प्रचंड घटला. याचे परिणाम आज समाज भोगत आहे. बालविवाह ही समस्या कायम चर्चेत आहे, परंतू आता लग्नाळू तरूणांचे वय उलटून गेले तरी या मुलांना लग्नाळू मुली मिळणे दुरापास्त झाले आहे.समाजाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी भीषण समस्या आहे.यावर तोडगा काढण्यासाठी लग्नाळू मुले दलालांच्या माध्यमांतून मिळेल त्या जातीची, मिळेल त्या धर्माच्या मुलींशी विवाह करून आपला संसार उभा करत आहेत. काही जण तर परराज्यातील मुलींसोबत लग्न करत आहेत. दलालांमार्फत जुळणाऱ्या लग्नगाठीत मोठे आर्थिक व्यवहार होत आहेत.
मुलीला हुंडा
मुलीच्या घरच्यांना तीन लाख दिले, पाच लाख दिले, मुलाने मुलीला हुंडा दिला तेव्हा कुठं लग्न जमलं अश्या सुरस कथा नेहमी आपल्या अवतीभवती कानी पडतात. पण वय उलटून गेलेल्या लग्नाळू मुलांना आणि त्यांच्या कुटूंबाला फसवणाऱ्या टोळ्या (fake marriages racket in maharashtra) राज्यात सक्रीय आहेत. या टोळ्यांच्या माध्यमांतून लग्न करून येणाऱ्या नवर्या लग्नानंतर काही दिवस नांदतात, तर काही जणी तर लग्नाच्या दुसर्या तिसऱ्या दिवशी घरातला पैसा आणि दागिणे घेऊन परागंदा होत आहेत. राज्यात अश्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. इज्जतीचा पंचनामा नको म्हणून फसवणूक झालेली कुटूंब पोलिसांत तक्रार देण्यास पुढे येत नाहीत, यामुळे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे मनोबल वाढले आहे.
बनावट लग्नांचा सुळसुळाट
लग्न म्हणजे विश्वासाचा सोहळा; पण सध्या याच सोहळ्यात बनवाबनवीचा फंडा वापरला जातोय. विवाह लावून देण्याच्या नावाखाली बोगसगिरी केली जात असून, युवकांसह त्याच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचे दिसते. इच्छुक वराला मुलगी दाखविण्यापासून ते अक्षता टाकण्यापर्यंतचे सगळेच कार्यक्रम आता बनावट पध्दतीने उरकले जात आहेत. लग्नानंतर नवर्या लगेच फरार होत आहेत. यामुळे अनेक कुटूंबे अडचणीत सापडले आहेत.
लग्नानंतर बनावट नवर्या होत आहेत फरार
लग्न रखडलेले युवक शोधून त्यांच्या कुटुंबीयांना जाळ्यात ओढले जाते. तत्काळ मुलगी दाखवून लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले जाते. मुलगी दाखविल्यानंतर विवाहासाठी लाखात रक्कम सांगितली जाते. मुलीची परिस्थिती नसल्याने दागिने घालण्यासही सांगितले जाते. रखडलेले लग्न होऊ घातल्याने युवकांचे पालक पैसे, दागिने देतात.पैसे मिळताच बोगस विवाह पार पाडला जातो.विवाहनंतर वेगवेगळी कारणे सांगून नववधू पसार होते.
कर्जत- जामखेड मतदारसंघात अनेकांची फसवणूक
वय उलटून गेल्यानंतर आंतरजातीय, आंतरधर्मीय, परधर्मीय मुलींसोबत लग्न करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात असे अनेक विवाह गुपचुपपणे उरकण्यात येत आहेत. काहींनी परजिल्ह्यात, परराज्यात जाऊन दलालांमार्फत आपल्या रेशीमगाठी जुळवल्या आहेत, काही जण जुळवण्याच्या तयारीत आहेत. परंतू बनावट लग्न लावून अनेक तरुणांची कर्जत जामखेड मतदारसंघात फसवणूक झाल्याचेही प्रकार घडले आहेत. घडत आहेत. पण फसवणूक झालेल्यांनी पोलिसांत धाव घेतलेली नाही. काहींनी तेरी भी चुप – मेरी भी चुप असा पवित्रा घेतला आहे. परंतू अश्या स्वरूपाच्या विवाहातून काही तरूणांनी आपले संसार चांगल्या प्रकारे फुलवल्याचेही दिसत आहेत.गावागावात अशी अनेक उदाहरणे पहायला मिळत आहेत.
जात धर्मा पेक्षा सहजीवन महत्वाचे
विवाह रखडलेल्या तरूणांनी जात धर्म न पाहता मिळेल त्या जाती-धर्मातील मुलींशी लग्न करण्यास सुरुवात केली.राज्यात असे लाखो विवाह पार पडले आहेत. पडत आहेत. या विवाहातून जात धर्मापेक्षा सहजीवन महत्वाचे हाच संदेश दिला जात आहे.अश्या प्रकारचे विवाह मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत, यातून कोणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी मुलाकडील मंडळींनी चौकस रहायला हवं, मुलगी आणि तिच्या कुटुंबाची सखोल माहिती घ्यावी, दलालांमार्फत मुली पाहण्यास जात असाल तर त्या दलालाची संपुर्ण माहिती काढावी, सखोल माहिती घेऊनच लग्न जमवण्याचा विचार करावा, याशिवाय अश्या स्वरूपाच्या लग्नात फसवणूक झाल्यास आपल्या प्रतिष्ठेचं काय होईल याचा विचार न करता कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.