धक्कादायक : आधी बायकोचा गळा चिरला मग स्वता:लाही संपवले, आर्थिक संकटाने घेतला पती-पत्नीचा बळी, लेकरं आली उघड्यावर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कोरोना महामारीनंतर माणसाचे जगणेच बदलून गेले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. महागाईचा तर आगडोंब उसळला आहे. अश्यातच रोजचं जीवन जगणं सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेलं आहे. तुटपुंज्या जमापुंजीवर जगण्याची लढाई सुरू आहे, मात्र कधीतरी संयम तुटतो आणि टोकाचे पाऊल उचलले जातात. अश्याच परिस्थितीतून जाणाऱ्या एका कुटुंबाची मन हेलावून टाकणारी कहाणी समोर आली आहे.
विदर्भातील भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पतीने आपल्या पत्नीचा ब्लेडने गळा चिरत हत्या केली. त्याचबरोबर स्वता:चाही गळा चिरून आत्महत्या केल.ही धक्कादायक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही सीतासांगवी गावात घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, तुमसर तालुक्यातील गोबरवाही सीतासांगवी गावात अंडी विक्रेता सुशिल नीळकंठ बोरकर (वय 45) आणि आशा सेविका सरिता बोरकर हे दोघे पती – पत्नी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून सुशिल हा आर्थिक विवंचनेत होता. गुरुवारी रात्री दोघे पती पत्नी आपल्या खोलीत तर मुले दुसऱ्या खोलीत झोपी गेले होते.
शुक्रवारी सकाळी मुले शाळेत जाण्यासाठी उठले. आई वडीलांच्या रूमचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने मुलांनी आपल्या काकाला आवाज दिला. काकाने घरामागील दरवाजा तोडत घरात प्रवेश केला आणि सर्वांनाच हादरवून टाकणारे दृश्य नजरेस पडले. बोरकर पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. घटना ज्या खोलीत घडली त्या खोलीला आतून कडी होती, त्यामुळे बाहेर आत कोणी गेले नसेल. घटनास्थळी धारदार ब्लेड आढळून आले आहे.
सुशिल बोरकर यांनीच आपल्या पत्नीचा गळा चिरत हत्या केली, आणि त्यानंतर स्वता:ही त्याच धारदार ब्लेडने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली असे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, आर्थिक विवंचनेतून सुशिल बोरकर यांनी उचलले टोकाचे पाऊल मन हेलावून टाकणारे आहे. बोरकर पती पत्नी आपला जीव देऊन आर्थिक संकटातून सुटले खरे पण त्यांची लेकरं मात्र उघड्यावर आली आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.