Bulli Bai : GitHub App वर प्रसिद्ध मुस्लिम महिलांच्या फोटोंचा वापर, आक्षेपार्य मजकूर आला आढळून, राज्य महिला आयोगाने दिले कारवाईचे आदेश
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन ॲपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रसिध्द मुस्लिम महिलांच्या इंटरनेटवरील बदनामी प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.
दरम्यान शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे. चाकणकर यांनी ट्विट करत घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसेच दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत.
प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो, प्रोफाइल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून त्यांची माहिती सुल्ली डील नावाच्या ॲप वरून प्रसारित केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. देशातील समाजात तेढ निर्माण करून शांतता बिघडवून, राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. या प्रकारचे ॲप तयार करून गोळा केलेल्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’ विरुद्धसुद्धा कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोग कार्यालयाने सायबर विभागाला दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांतुन आपल्या दिसून येते की, सुल्ली डील ॲपवरून नामवंत महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे. त्यामुळे ही सर्व माहिती सोशल मीडियावरून तत्काळ काढून टाकण्यात यावी, असेही निर्देश राज्य महिला आयोग कार्यालयाद्वारे देण्यात आले आहेत.
दिल्लीत एका महिलेने इंटरनेटवर प्रसिध्द करण्यात आलेले बदनामीकार फोटो ट्वीटरवर शेअर केले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.त्यानंतर या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे. हाच मुद्दा प्रियंक चतुर्वेदी यांनी उचलून धरला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच सायबर सेलकडे देखील त्यांनी तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब या ॲपवर टाकून त्यांची बदनामी केली जात आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. याप्रकरणातील काहीजण हे मुंबईचे असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना याबाबत कोणताही तपास लागला नाही. ते याप्रकरणाचा छडा लावण्यात असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महिलांच्या सन्मान राहणे गरजेचे आहे. महिलांच्या विरोधात कोणी काही बोलले तर त्याविरोधात शिवसेना कायमच महिलांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. महिलांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो प्रसिद्ध कसे केले जातात. याचा खुलासा करणे गरजेचे आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे यांच्याकडे याबाबत सांगितले होते, मात्र, त्यांच्याकडून सतर्क असून, कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र,अद्याप कारवाई झाली नसल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले.
GitHube म्हणजे काय ?
GitHub हा इंटरनेट होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. जिथे अॅप आणि सॉफ्टवेअर विकसित आणि लॉन्च केले जातात. हे एक खुले व्यासपीठ आह, जिथे वापरकर्त्याला अनेक प्रकारचे अॅप्स मिळतात. हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना अॅप तयार आणि शेअर करण्यास अनुमती देते. याची सुरुवात 2008 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे झाली. त्याचे सध्याचे सीईओ थॉमस डोमके आहेत.
बुली बाई या वादग्रस्त ॲपमध्ये काय ?
बुल्ली बाई या अॅपवर मुस्लिम महिलांना लक्ष्य केले जात आहे. हे अॅप ओपन केल्यावर यूजरला महिलांचे वेगवेगळे फोटो दिसतात. त्यानंतर वापरकर्ता यापैकी एका महिलेचे चित्र त्या दिवसातील बुल्ली बाई म्हणून निवडतो. यानंतर त्या महिलेची बोली लावली जाते. बिडिंग सोबत #BulliBai हे पण पोस्ट मध्ये लिहिले जाते. दिवसभर त्याचा ट्रेंड असतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अॅपवर विशेषतः त्या मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात आहे ज्यांची समाजात स्वतःची ओळख आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धैर्याने बोलतात. बुल्ली बाई, सुल्ली डील्स सारखे काम करणारे आणखी एक अॅप ६ महिन्यांपूर्वी आले होते. जुलैमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. जेव्हा अॅपमुळे ‘डील्स ऑफ द डे’ ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर गिटहबला सुल्ली डील अॅप आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावे लागले होते.