जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील एका ऊस बागायतदार शेतकऱ्याची केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमाभागात घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील आदिवासी बहूल भागातून ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेलेले ऊस बागायतदार शेतकरी प्रशांत महादेव भोसले हे मजुरांना घेऊन महाराष्ट्रात परतत असताना त्यांच्यावर मजुरांनी प्राणघातक हल्ला करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोसले हे सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहेत.
माढा तालुक्यातील बेंबळे गावातील ऊस बागायतदार प्रशांत भोसले हे आपल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवरील एका आदिवासीबहुल गावात मजुर आणण्यासाठी गेले होते. मजुर घेऊन परतत असताना मजुरांनी भोसले यांना बेदम मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार उघडकीस आली आहे.
प्रशांत भोसले हे ऊसतोड मजुर आणण्यासाठी मध्यप्रदेशात गेले होते. त्यांची एका मुकादमाशी चर्चा झाली होती.त्यानुसार ते आपल्या स्कॉर्पिओ गाडीने गेले होते. त्यांच्यासोबत मुकादमही होता. मध्यप्रदेशातील मजुरांच्या गावी गेल्यानंतर भोसले यांनी मजुरांना पैश्यांचे वाटप केले. त्यानंतर ते मजुरांना घेऊन टेम्पोने महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. प्रशांत भोसले हे मजुरांसह टेम्पोत होते. तर त्यांचे सहकारी स्कॉर्पिओ गाडीत होते.
मजुरांचा टेम्पोच्या पुढे स्कॉर्पिओ होती. मात्र टेम्पो मागे राहिल्याने स्कॉर्पिओतील सहकाऱ्यांनी भोसले यांना फोन केला असता त्यांचा फोन बंद आला. बराच वेळ टेम्पोची वाट पाहिल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील सहकारी पुन्हा मागे फिरले. रस्त्यात प्रशांत भोसले हे पडलेले दिसले. यावेळी भोसले यांना बेदम मारहाण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळाहून ऊसतोड मजुर टॅम्पोसह फरार झाले होते.
ऊसतोड मजुरांनी बागायतदार प्रशांत भोसले यांना लोखंडी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत भोसले यांची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर मजुरांनी भोसले यांच्याकडील पैसे घेऊन मजुर फरार झाले.
दरम्यान, या घटनेने माढा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भोसले यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.