जामखेड : श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आमदार प्रा. राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : काही दिवसांपुर्वीच श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 3 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता येत्या आठवडाभरात होणार असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी माझे जे कर्तव्य आहे ते पार पाडेल त्यात कुठलाही कसूर राहणार नाही. नागेश्वर मंदिराची हक्काची जागा जसी-जसी उपलब्ध होईल तसा-तसा या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी माझी असेल असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी जामखेडमध्ये बोलताना केले.
जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर योत्रोत्सवानिमित्त नागेश्वर मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी या सप्ताहाची सांगता ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) अध्यापक सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांनी काल्याच्या किर्तनास हजेरी लावली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने आमदार प्रा राम शिंदे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, नागेश्वर मंदिर परिसराचा विकास व्हावा अशी भक्तगणांची अपेक्षा रास्त आहे, माझीही तीच इच्छा आहे. नागेश्वर मंदिराची हक्काची जागा जसी जशी उपलब्ध होईल तसा तसा या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी माझी असेल, तुम्ही जेवढा मोठा सभामंडप मागाल तो पुढच्या वर्षी उभा राहिल. फक्त त्यासाठी दोन महिन्याच्या आत जागा उपलब्ध करून द्यावी. श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासाच्या कामामध्ये कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द यावेळी आमदार शिंदे यांनी दिला.
2019 मध्ये मंत्री असताना मंदिर परिसराच्या विकासासाठी दीड कोटी रूपयांचा निधी दिला होता. परंतु तो निधी येथे येऊ शकला नाही, कारण तेव्हा मी निवडणूक हरलो परंतू पुढे संबंधिताकडून जी कार्यवाही करणं अपेक्षित होती ती झाली नाही.परंतू श्री नागेश्वराच्या आणि तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने मी पुन्हा आमदार झालो. आमदार होताच जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी 3 कोटींचा निधी दिला आहे. त्याचबरोबर शहरातील इतरही धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, असे शिंदे म्हणाले.
जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे श्री नागेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. यामध्ये महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.