जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री पुण्यात निधन झालं. (Sindhutai Sapkal Death News) वयाच्या 75 वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. उभं आयुष्य अनाथांच्या सेवेला वाहून घेतलेल्या माईने अवघ्या महाराष्ट्राला पोरकं केलं.
पुण्यातील गॅलॅक्सी केअर या हाॅस्पीटलमध्ये सिंधुताईंवर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी समजताच सिंधुताईंची मुलगी ममता सपकाळ आणि नातेवाईकांनी रूग्णालयाच्या बाहेर एकच हंबरडा फोडला.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी आजवर हजारो अनाथांचे संगोपन केले. त्यांनी केलेल्या कार्यातून सामाजिक सेवेचा प्रचंड मोठा वटवृक्ष निर्माण झाला. त्याचं कुटूंब इतकं मोठं होतं की शेकडो मुलं, मुली, जावई या सर्वांवर सिंधुताई यांच्या जाण्याने दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आई जाण्याचं दु:ख कुणालाच सहन न होणारं असतं. मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेनं अवघा महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
अन् सिंधुताईंच्या मुलीने हंबरडा फोडला (Sindhutai Sapkal Death News)
दरम्यान सिंधुताईंची मुलगी ममता सपकाळ यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना माई गेल्यात असं कोणीही म्हणून नका असं अवाहन केलं आहे. कारण माई हे एक वादळ होतं, ते फक्त आता शांत झालं आहे. माईनं केलेल्या कामाच्या स्वरूपात त्या नेहमी आपल्या सोबत राहतील. त्यांनी अत्तापर्यंत निर्माण करून ठेवलेलं सगळं इथून पुढेही असचं सुरूच राहील. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या कामाच्या माध्यमांतून त्या नेहमीच आमच्या सोबत राहतील असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून 2021 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. राजकीय सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत श्रध्दांजली वाहत सिंधुताईंच्या कार्याचा गौरव केला.