जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 5 जानेवारी । जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी रात्री सिंधुताईंचं पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं होतं. सिंधुताईंच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सिंधुताईंवर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मांजरी येथील बाल सदन संस्थेत सिंधुताईंचे पार्थिव अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी शेकडो नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
म्हणून करण्यात आला दफनविधी
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्यावर महानुभव पंथाच्या परंपरेनुसार अंतिम संस्कार करत दफनविधी करण्यात आला. दरम्यान सशस्त्र मानवंदना दिल्यानंतर ममता सपकाळ यांच्याकडे तिरंगा सोपवण्यात आला. सिंधूताईंना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
सिंधुताई महानुभव पंथाचे आचरण करत होत्या, त्या कृष्ण भक्त होत्या. म्हणून त्यांच्यावर महानुभव पंथाच्या परंपरेनुसार अंतिम संस्कार करण्यात आले. महानुभव पंथात केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराला ‘निक्षेप’ असं म्हटलं जातं.