Solapur ACB Trap Today : प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार अडकला एसीबीच्या जाळ्यात,तिघा जणांविरुद्ध गुन्हे दाखल, महसूल विभागात उडाली खळबळ
Pandharpur ACB Trap News : राज्यात गेल्या काही दिवसांत वरिष्ठ अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.अशीच एक घटना पंढरपूर येथून समोर आली आहे. अँटी करप्शन विभागाने टाकलेल्या धाडीत नायब तहसीलदार पंधरा हजार रूपयांची लाच घेताना अडकला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार व दोन खाजगी इसम अश्या तिघा जणांविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. (Solapur ACB Trap Today)
याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या शेजारी १० गुंठे शेतजमीन खरेदी केली असून, सदर शेत जमीन खरेदी करीता उपविभागीय अधिकारी, उपविभाग पंढरपूर यांची परवानगी आवश्यक होती. त्यानुसार तक्रारदार यांनी परवानगी मिळणेकरीता पंढरपूर प्रांत कार्यालयाला प्रस्ताव सादर केला होता. सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडून मंजुर करुन शेतजमीन खरेदीची परवानगी देण्याकरीता पंढरपूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार आप्पासाहेब शिवाजी तोडसे यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतू तडजोडीअंती १५ हजार रूपयांची लाच घेण्याचे मान्य केले होते. सदरची लाच रक्कम खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम याच्याकडे देण्यास सांगीतली होती.
त्यानुसार, तक्रारदार यांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. सोलापूर एसीबीच्या पथकाने 17 ऑगस्ट 2023 रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर एसीबीने सापळा कारवाई केली. पंढरपूर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार आप्पासाहेब तोंडसे यांच्यासाठी किराणा दुकानदार तुकाराम बाळकृष्ण कदम याने 15 हजार रूपयांची लाच स्वीकारून ती सचिन विठ्ठल बुरांडे याच्याकडे दिली. सचिन बुरांडे याने सदरची लाच रक्कम स्विकारली.
एसीबीने आप्पासाहेब शिवाजी तोंडसे, वय- ५६ वर्षे, पद- नायब तहसिलदार नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर, खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम, वय ५९ वर्षे, व्यवसाय किराणा दुकान, रा. घर नंबर ४७११/६. गौतम विद्यालय समोर, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर, आरोपी खाजगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे, वय- ४६ वर्षे, रा. विट्ठलनगर, गौतम विद्यालय शेजारी, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर या तिघांना रंगेहाथ पकडले. या तिघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ ,१२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (IPS Amol Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार (DYSP Ganesh Kumbhar) यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात सोलापूर एसीबीचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, शिरीषकुमार सोनवणे,अतुल घाडगे,सलिम मुल्ला, राहुल गायकवाड यांचा समावेश होता.